राज्यात दुष्काळाची झळ बसत असताना शेतकरी आणि सामान्य कर्जदार आधीच मोठ्या अडचणीत आहेत. अशा काळातही बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीचा तगादा सुरूच असल्याचा आरोप आमदार परिणय फुके यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगूनही वसुली थांबलेली नाही, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी फायनान्स कंपन्या आणि बँकांना थेट इशारा दिला आहे.
वाहनी गावातील घटनेवरून संताप
भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील वाहनी गावात एका कर्जदाराचे घर फायनान्स कंपनीने कुलूपबंद केल्याची घटना समोर आली आहे. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर फुके यांनी संताप व्यक्त केला. कर्जदारांना त्रास दिल्यास त्याला त्यांच्या पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
कर्जदारांना आवाहन
दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर आणि सर्वसामान्य कर्जदारांवर अशी जबरदस्ती करणे चुकीचे असून या प्रकारांना तात्काळ आळा बसला पाहिजे, असे फुके म्हणाले. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी व कर्जदारांना बँक किंवा फायनान्स कंपनीकडून त्रास होत असल्यास त्यांनी घाबरून न जाता भाजपने दिलेल्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. तक्रार मिळताच भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संबंधित कर्जदाराच्या मदतीला तात्काळ धावून जातील, असा दावाही त्यांनी केला आहे.
Leave a Reply