कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाने आणि वारणा दूध संघाने विक्री दरात प्रतिलिटर सहा रुपयांची वाढ केली आहे. गोकुळने याआधी कधीही एकाच वेळी एवढी मोठी दरवाढ केलेली नव्हती. त्यामुळे राज्यभरात दुधाच्या दरांवर जोरदार चर्चा सुरू झाली असून, ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मात्र खरेदी दरात फक्त तीन रुपयांची वाढ मिळाली आहे.
कोल्हापूर, पुणे आणि मुंबईतील नवे दर
गोकुळ दुधाचा कोल्हापुरातील दर प्रतिलिटर ७२ रुपयांवरून ७८ रुपये झाला आहे. पुणे आणि मुंबईत हाच दर ७८ रुपयांवरून ८४ रुपये झाला आहे. वारणा दुधाचे दरही याच पद्धतीने वाढले आहेत. अमूल गोल्ड दुधाचा दर ७२ रुपयांवरून ७६ रुपये, तर मदर डेअरीच्या फुल क्रीम दुधाचा दर ७२ रुपयांवरून ७६ रुपये झाला आहे. प्रशासक काळात संघाला झालेला तोटा भरून काढण्यासाठी ही दरवाढ केल्याचे संघाकडून सांगण्यात आले आहे.
शेतकरी नाराज, ग्राहकही त्रस्त
पशुखाद्य आणि चाऱ्याचे दर वाढलेले असताना शेतकऱ्यांना किमान सहा रुपयांची वाढ अपेक्षित होती. मात्र ग्राहकांच्या माथ्यावर सहा रुपये टाकून शेतकऱ्यांना केवळ तीन रुपये दिल्याने दूध उत्पादकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुष्काळामुळे दूध उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून, राज्यात दुधाची टंचाई जाणवत आहे. येणाऱ्या काही महिन्यांत दर आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात ही अडचण आणखी वाढू शकते, असेही सांगण्यात येत आहे. दरवाढीमुळे महागाईने त्रस्त ग्राहकांवर आणखी भार पडणार असून, मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून दर कमी करावेत, अशी मागणी होत आहे.
Leave a Reply