वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने भारताला दमदार सुरुवात करून दिली. पहिल्याच षटकात त्याने न्यूझीलंडचा कर्णधार आणि सलामीवीर टॉम लॅथमला शून्यावर माघारी धाडले. त्यानंतर डेव्हॉन कॉनवेच्या विकेटचेही त्याने सेलिब्रेशन केले. मात्र डीआरएसच्या नाट्यानंतर बुमराहचा हिरमोड झाला आणि न्यूझीलंडला दिलासा मिळाला. पण हा दिलासा फार काळ टिकला नाही.
पंचांचा निर्णय डीआरएसने फिरवला
तिसऱ्या षटकात बुमराहने कॉनवेच्या विकेटसाठी जोरदार अपील केले. मैदानावरील पंचांनी कॉनवेला बाद घोषित केले. मात्र न्यूझीलंडच्या सलामीवीराने डीआरएस घेतला. रिप्लेमध्ये चेंडू बॅटला लागला नसल्याचे स्पष्ट झाले आणि पंचांना आपला निर्णय बदलाव लागला.
कंबोजने दिला दुसरा धक्का; रवींद्रची विकेटही हुकली
डीआरएसमुळे न्यूझीलंडला दिलासा मिळाला. मात्र कॉनवेला फार काळ मैदानात तग धरता आला नाही. पुढच्याच षटकात अंशुल कंबोजने त्याला रिषभ पंतकरवी विकेटमागे झेलबाद केले. कॉनवे १३ चेंडूंत ४ धावा करून माघारी परतला. अवघ्या १२ धावांवर न्यूझीलंडला दुसरा धक्का बसला. अकराव्या षटकात कंबोजने रचिन रवींद्रलाही चकवले. ऑफ स्टंपच्या बाहेर टप्पा पडलेला चेंडू आतल्या दिशेने वळला. रवींद्रने क्रीजमध्येच थांबून फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन यष्टिरक्षक पंतच्या हातात विसावला. पंतने जोरदार अपील केले. मात्र कंबोजने फारसा उत्साह दाखवला नाही आणि गिलनेही डीआरएस घेतला नाही. रिप्लेमध्ये चेंडू बॅटची कड घेऊन गेल्याचे स्पष्ट झाले. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. त्यामुळे कंबोजच्या खात्यात जमा होऊ शकणारी विकेट त्याला मिळाली नाही.
Leave a Reply