जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्याला अंशुल कंबोज आणि आकाश दीपने दिलेल्या साथीच्या जोरावर भारताने वेलिंग्टनमधील पहिल्या कसोटीचे पहिले सत्र गाजवले. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी उपाहारापर्यंत यजमान न्यूझीलंडचे आघाडीचे चार फलंदाज अवघ्या ६० धावांत माघारी धाडले. बुमराहने दोन, तर कंबोज आणि आकाश दीपने प्रत्येकी एक विकेट घेतली.
पहिल्या चार षटकांत दोन्ही सलामीवीर बाद
बुमराहने पहिल्याच षटकात भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमला खातेही न उघडता बाद केले. चौथ्या षटकात अंशुल कंबोजने डेव्हॉन कॉनवेला चार धावांवर रिषभ पंतकरवी झेलबाद केले. त्यामुळे न्यूझीलंडने अवघ्या १२ धावांत दोन्ही सलामीवीरांच्या विकेट गमावल्या.
रवींद्र-निकोल्सची झुंज आणि बुमराहचे पुनरागमन
सलामीवीर बाद झाल्यानंतर हेन्री निकोल्स आणि रचिन रवींद्र यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९५ चेंडूंत ३९ धावांची भागीदारी रचली. रवींद्रच्या बॅटची कड घेऊन गेलेल्या एका चेंडूवर गिलने रिव्ह्यू घेण्याची संधी गमावली. मात्र त्यानंतर आकाश दीपने रवींद्रला १५ धावांवर बाद करून भागीदारी फोडली. न्यूझीलंडने ५१ धावांवर तिसरी विकेट गमावली. उपाहारापूर्वी कर्णधार गिलने पुन्हा चेंडू बुमराहकडे सोपवला. भारताविरुद्ध दमदार रेकॉर्ड असलेल्या डॅरिल मिचेलला बुमराहने अवघ्या एका धावेवर माघारी धाडले. ही विकेट मिळवून देण्यात यशस्वी जैस्वालने फॉरवर्ड शॉर्ट लेगला उत्कृष्ट झेल टिपला. न्यूझीलंडला ५२ धावांवर चौथा धक्का बसला आणि उपाहाराच्या वेळी संघाची धावसंख्या ६० धावांवर चार बाद अशी होती.
Leave a Reply