पेण तालुक्यातील खारेपाट भागात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आता तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे आधी दोन दिवसांतून तिसऱ्या दिवशी मिळणारे पाणी आता तीन दिवसांच्या अंतराने, म्हणजेच चार दिवसांतून एकदा मिळणार आहे. या बदलामुळे खारेपाटातील नागरिकांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडणार आहे.
रात्री-अपरात्री पाण्यासाठी जागरण
आधीच अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा, त्यात आता तीन दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकानुसार अनेक गावांमध्ये रात्री उशिरा, मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे दिवसभर शेतात कष्ट करून घरी परतणाऱ्या शेतकरी कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी रात्री-अपरात्री जागे राहण्याची वेळ येणार आहे.
विशेषतः महिलांना घरातील स्वयंपाक, पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी आणि इतर दैनंदिन कामांचे नियोजन करताना मोठी कसरत करावी लागणार आहे. पाणी येण्याची वेळ रात्रीची असल्याने घरातील कामे बाजूला ठेवून पाण्याची वाट पाहावी लागणार आहे. पाणी साठवून ठेवण्याची मर्यादा असल्याने अनेक कुटुंबांसमोर पाण्याचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
हेटवणे धरणावरून ग्रामस्थांचा सवाल
उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा, जिल्हा परिषद उपविभाग पेण यांच्या कार्यालयाकडून ग्रामपंचायतींना तीन दिवसाआड पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पाठविण्यात आले आहे. कमी पर्जन्यमानामुळे पाणी उपलब्धतेवर परिणाम झाल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार वडखळ, वाशी, खारेपाट तसेच इतर विभागांतील गावांसाठी वेगवेगळ्या वेळांमध्ये पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे.
पेण तालुक्यातील हेटवणे धरण येथील स्थानिक नागरिकांच्या जमिनी संपादित करून बांधण्यात आले आहे. मात्र या धरणातील पाणी मुंबईतील नागरिकांना दिले जाते. जर हेटवणे धरणाचे पाणी पेण तालुक्यातील जनतेला दिले असते, तर पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवला नसता, अशी भूमिका ग्रामस्थ मांडत आहेत. याला लोकप्रतिनिधी जबाबदार की प्रशासकीय अधिकारी, असा प्रश्नही ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. पाणीटंचाईवर उपाय म्हणून पाणीपुरवठ्याचे दिवस कमी करण्याऐवजी पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार, असा सवालही ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
Leave a Reply