बेल्हे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिनीला राजुरी येथे सिमेंट काँक्रिटच्या घराखाली गळती लागल्याने गुंजाळवाडी, बेल्हे, गुळुंचवाडी आणि आणे या चार गावांचा पाणीपुरवठा गेल्या दोन महिन्यांपासून विस्कळीत झाला आहे. जलवाहिनीतील गळतीचे पाणी संबंधित घरात साचत असून, पुढील गावांपर्यंत पाणी पोहोचण्यास अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे हजारो ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
दुरुस्तीत घराचा अडथळा
बेल्हे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीवर राजुरी येथे सिमेंट काँक्रिटचे घर बांधण्यात आल्याने दुरुस्तीच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. जलवाहिनी घराखालून गेल्यामुळे गळती दुरुस्त करणे अवघड झाले असून, घर हटविल्याशिवाय किंवा घराच्या परिसरातून पर्यायी जलवाहिनी टाकल्याशिवाय पाणीपुरवठा सुरळीत होणे कठीण असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
टँकर हा कायमस्वरूपी उपाय नाही
ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, टँकरच्या माध्यमातून तात्पुरती गरज भागवली जात असली, तरी मूळ समस्येचे निराकरण अद्याप झालेले नाही. दरम्यान, बेल्हे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या नवीन जलवाहिनीचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत संबंधित गावांचा पाणीपुरवठा नियमित होण्यास अडचणी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आणखी किती दिवस टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागणार, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.
पाच दिवसांत पर्यायी व्यवस्था
ग्रामस्थांचा वाढता रोष लक्षात घेता संबंधित ठेकेदाराकडून लवनवाडी येथे नवीन जलवाहिनीमध्ये जुन्या जलवाहिनीचे पाणी सोडून तात्पुरती पर्यायी व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी सुमारे पाच दिवस लागणार असल्याची माहिती ठेकेदार मंगेश शिंदे यांनी दिली. जलवाहिनीच्या जागेवर बांधकाम सुरू असताना संबंधित यंत्रणेला याची माहिती नव्हती, असे म्हणणे पटण्यासारखे नाही. मग वेळीच कारवाई का करण्यात आली नाही? कोणाच्या दबावामुळे अथवा हितसंबंधांमुळे या प्रकाराकडे दुर्लक्ष झाले का, असे सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही संतप्त ग्रामस्थांनी केली आहे. टँकरच्या पाण्याने ग्रामस्थांची तहान किती दिवस भागविणार? जलवाहिनीचा अडथळा कायमस्वरूपी दूर करून नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी प्रशासनाने ठोस कालमर्यादा जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Leave a Reply