रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

पवई तलावावर भव्य म्युझिकल फाउंटन, रविवारी उद्घाटन

पवई तलावावर ३० कोटी खर्चून १८० मीटर लांबीचा म्युझिकल फाउंटन उभारला आहे. रविवारी सायंकाळी सात वाजता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

पवई तलावावर भव्य म्युझिकल फाउंटन, रविवारी उद्घाटन

मुंबईच्या पर्यटन वैभवात आणखी एका आकर्षणाची भर पडणार आहे. पवई तलावावर सुमारे ३० कोटी रुपये खर्चून १८० मीटर लांबीचा अत्याधुनिक म्युझिकल फाउंटन उभारण्यात आला आहे. पवई तलाव येथील गणेश घाट परिसरात या लाईट, साउंड आणि संगीतमय कारंजे शोचा उद्घाटन सोहळा रविवारी सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आला आहे. कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. मंत्री लोढा यांच्या विशेष प्रयत्नांमुळे मुंबई उपनगर जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध झाला असून, म्हाडाच्या माध्यमातून या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.

४० मीटर उंच पाण्याचे कारंजे

या म्युझिकल फाउंटनमध्ये अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तब्बल ४० मीटर म्हणजेच १३० फूट उंचीपर्यंत पाण्याचे जेट्स झेपावणार आहेत. तसेच २७ फायर जेट्स या शोचे प्रमुख आकर्षण असतील. रनिंग फाउंटन चेसर्स, थ्रीडी स्विंग नॉझल्स आणि फॅन जेट्सच्या माध्यमातून पाण्याच्या विविध आकर्षक रचना साकारल्या जाणार आहेत. संगीताच्या तालावर नृत्य करणारे पाण्याचे कारंजे, आगीच्या ज्वाळा, वॉटर स्क्रीनवरील प्रोजेक्शन आणि लेझर प्रतिमा यांचा अनोखा संगम पर्यटकांना अनुभवता येणार आहे.

या प्रकल्पांतर्गत जागतिक दर्जाचा मल्टिमीडिया लाईट अँड साउंड शो सादर केला जाणार आहे. यामध्ये तीन वेगवेगळे चित्रपट दाखवले जातील. छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास आणि मराठ्यांचा पराक्रम, महाराष्ट्राची संस्कृती व वैभव तसेच मुंबईची गौरवशाली कहाणी अशा तीन विषयांवर आधारित सादरीकरण करण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

दररोज तीन शोचे नियोजन

पर्यटकांसाठी दररोज सुमारे तीन तासांच्या कालावधीत तीन शो आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शोच्या संचालनासाठी स्वतंत्र कंट्रोल रूम, प्रशिक्षित कर्मचारी, सीसीटीव्ही यंत्रणा, अग्निशमन उपकरणे, सुरक्षा रक्षक आणि प्राथमिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय अखंड वीजपुरवठ्यासाठी डीजी सेट, प्लास्टिक खुर्च्या आणि व्हीलचेअर यांसारख्या सुविधांचाही समावेश आहे. प्रकल्पाच्या निविदेत तीन वर्षांच्या सर्वसमावेशक देखभाल व दुरुस्तीची तरतूद असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षांच्या संचालनाचीही तरतूद करण्यात आली आहे.

या म्युझिकल फाउंटनमुळे केवळ पर्यटनालाच चालना मिळणार नाही, तर तलावातील पाण्याच्या एरेशन प्रक्रियेलाही मदत होणार आहे. दररोज सुमारे ३० लाख लिटर पाण्यात हवा मिसळण्याची प्रक्रिया होईल. त्यामुळे पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास मदत होऊ शकते. याशिवाय बाष्पीभवनामुळे परिसरात थंडावा निर्माण होणे आणि हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होणे असे संभाव्य पर्यावरणीय फायदे अपेक्षित आहेत. पवई तलावातील जलचरांना कोणतीही हानी पोहोचू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. फाउंटनमध्ये केवळ एलईडी दिव्यांचा वापर केला जाणार असून, प्रकाश पाण्याच्या पृष्ठभागावरून वरच्या दिशेने दिला जाणार आहे. तसेच ध्वनीची तीव्रता निर्धारित डेसिबल मर्यादेत ठेवली जाणार आहे.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance