मराठी अभिनेते अशोक शिंदे यांनी अनेक गाजलेल्या मालिका आणि सिनेमांमध्ये काम केले आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अशोक सराफ, डॉक्टर श्रीराम लागू आणि अलका कुबल यांसारख्या कलाकारांसोबत काम केले आहे. एका मुलाखतीत अशोक शिंदे यांनी अलका कुबल यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
अशोक सराफ यांच्याकडून वेळेचे धडे
अशोक शिंदे म्हणाले की, त्यांनी अशोक सराफ यांच्याकडून वेळेचे महत्त्व शिकले. सिनेमाच्या सेटवर सराफ कधीच कुणाला लवकर सोडण्याबाबत विचारत असल्याचे त्यांनी ऐकले नाही. एखादी वेळ दिली की दुसऱ्या दिवशी ते अगदी त्याच वेळेला सेटवर हजर असायचे. एकदा एका सिनेमाच्या सेटवर त्यांना काहीही काम दिले नव्हते, तरीही ते चार दिवस सेटवर असेच बसून होते. अशोक शिंदे यांनी त्यांना विचारले की, त्यांनी शूटिंग आधी करून घेण्याबाबत का सांगितले नाही. त्यावर सराफ म्हणाले की, त्यांनी आधीच आपल्या तारखा दिल्या आहेत, त्यामुळे त्या तारखांना तिथे थांबणे गरजेचे आहे.
अलका कुबल यांची शिस्त
अलका कुबल यांचा किस्सा सांगताना अशोक शिंदे म्हणाले की, त्या त्यांच्यापेक्षा सिनियर होत्या. त्यांच्या आधी तिचे दोन सिनेमे आले होते. त्या त्यावेळी त्यांना अगदी फाडूनच खायच्या. नऊच्या शिफ्टला ते जर ९:१० किंवा ९:१५ ला आले, तर संपले. मग त्या सगळ्यांसमोर त्यांचा पाणउतारा करायच्या. त्यामुळे ते मान खाली घालून राहायचे, कारण त्या भयंकर चिडलेल्या असायच्या.
अशोक शिंदे यांनी सांगितले की, दोघांनी साधारण २३ सिनेमे हीरो-हीरोइन म्हणून केले आहेत. कोल्हापूरला अलका कुबल आणि त्यांच्या नवऱ्याचे प्रोडक्शन हाऊस आहे. त्याच प्रोडक्शन अंतर्गत त्यांनी ‘सुहासिनीची सत्वपरीक्षा’ हा सुपरहिट सिनेमा केला होता. अलका कुबल त्यांना म्हणायच्या की, आज रात्री जागरण करू नको, कारण उद्या सकाळी लवकरची शिफ्ट आहे. सातची शिफ्ट असली की साडेसहाला खाली जमायचे असायचे. पण त्या सकाळी साडेपाच वाजताच येऊन बेल मारायच्या. हे लोक दिग्गज असूनही आपल्या कामात अगदी चोख असायचे, असे अशोक शिंदे म्हणाले.
Leave a Reply