चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे वडील प्रेम गोविंद सिन्हा यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर अनुभव सिन्हा यांनी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
अनुभव सिन्हा यांनी वडिलांचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे आणि हिंदीमध्ये एक नोट लिहिली आहे. त्यांनी लिहिले की, अचानक घर अधिक मोठे आणि रिकामे वाटू लागले. अचानक त्यांचे नवीन फोटो दिसेनासे झाले. अचानक त्यांच्यासाठी नवीन मिठाई शोधणेही थांबले. बाकी सगळे तसेच राहणार होते. त्यांच्यावरचे प्रेम. त्यांच्याशी होणारे संवाद. सगळे तसेच राहणार होते. नाही, सगळे नाही. ९५ वर्षे हा काही कमी काळ नाही, पण तो पुरेसाही नाही.
आई-वडिलांच्या लग्नावेळचा खास किस्सा
अनुभव सिन्हा यांनी या पोस्टमधून आई-वडिलांच्या लग्नावेळचा एक खास किस्साही सांगितला आहे. आई त्यांना सांगायची की, जेव्हा बाबा लग्नासाठी तिला भेटायला गेले होते, तेव्हा त्यांनी गाण्याचा हट्ट धरला होता. त्यांनी त्यांचे आवडते गाणे, ‘छोटी सी ये जिंदगानी रे’ गायले होते. त्यानंतर अनुभव आणि त्यांचे कुटुंबीयही अनेकदा त्यांच्याकडून हे गाणे ऐकायचे.
प्रेम गोविंद सिन्हा १९ नोव्हेंबर २०२६ रोजी वयाच्या ९५ व्या वर्षी निधन पावले. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अनुभव सिन्हा यांची कारकीर्द
अनुभव सिन्हा यांनी मनोरंजन क्षेत्रात तीन दशकांहून अधिक काळ कारकीर्द घडवली आहे. त्यांनी सुरुवातीला टेलिव्हिजन क्षेत्रात काम केले, त्यानंतर काही म्युझिक व्हिडिओंचे दिग्दर्शन केले आणि २००१ मध्ये ‘तुम बिन’ या चित्रपटाद्वारे फीचर फिल्म दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले.
त्यानंतर त्यांनी ‘आपको पहले भी कहीं देखा है’, ‘दस’, ‘तथास्तु’, ‘कॅश’, ‘रा.वन’ आणि ‘तुम बिन २’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. २०१८ मध्ये ‘मुल्क’ चित्रपटापासून त्यांच्या दिग्दर्शनात एक वास्तववादी वळण आले. त्यानंतर त्यांचे २०१९ मध्ये ‘आर्टिकल १५’ आणि २०२० मध्ये ‘थप्पड’ हे चित्रपट आले.
Leave a Reply