पुण्यात एका नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या १९ वर्षांच्या विद्यार्थिनीला तब्बल १४ तास लिफ्टमध्ये अडकून राहावे लागले. अन्न-पाण्याविना ती एवढा वेळ लिफ्टमध्येच होती. रात्रभर शोधाशोध केल्यानंतरही तिचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी तिची सुटका झाली. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी बुधवारी दुपारी साडेतीन वाजता व्याख्यान संपल्यानंतर लिफ्टने निघाली होती. त्यावेळी लिफ्टमध्ये ती एकटीच होती. अचानक वीजपुरवठा खंडित झाला आणि लिफ्ट पाचव्या व सहाव्या मजल्यादरम्यान थांबली. त्यामुळे ती लिफ्टमध्येच अडकून पडली. बाहेर पडण्यासाठी तिने जोरजोरात आवाज दिला, मात्र कोणीही मदतीला आले नाही. लिफ्टमधून बाहेर येण्याचा दुसरा कोणताही मार्ग नव्हता.
रात्रभर शोधाशोध, सकाळी सुटका
विद्यार्थिनीचा संपर्क तुटल्यानंतर कुटुंबीय चिंतेत पडले. त्यांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. नातेवाईकांकडे विचारपूस केली, तरीही तिचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर महाविद्यालयाचे कर्मचारी, पोलीस आणि कुटुंबीयांनी रात्रभर महाविद्यालयाच्या परिसरात तिचा शोध घेतला. शोधादरम्यान परिसरातील एका लिफ्टमध्ये ती असल्याचे लक्षात आले. दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी लिफ्ट सुरू झाली आणि तिची सुटका झाली. अन्न-पाण्याविना १४ तास लिफ्टमध्ये अडकल्याने ती खूप घाबरलेली होती.
सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर महाविद्यालयाची सुरक्षा व्यवस्था आणि लिफ्टची देखभाल यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. महाविद्यालयाची आपत्कालीन यंत्रणा कार्यक्षम नसल्याचे समोर आले आहे. लिफ्टमध्ये अडकलेल्या विद्यार्थिनीला मदत मिळण्यासाठी कोणतीही यंत्रणा का कार्यान्वित झाली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. महाविद्यालय प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली असून चौकशी समिती स्थापन केली आहे. समितीकडून तांत्रिक चौकशीसह इतर बाबी तपासल्या जातील. लिफ्टचा वीजपुरवठा जवळपास पाच ते सहा तास खंडित होता, असे समोर आले आहे. महाविद्यालय पोलिसांच्या संपर्कात असून या प्रकरणी कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे महाविद्यालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
Leave a Reply