उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तब्बल दहा महिन्यांपासून रखडलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या १६ सदस्यांची नावे शुक्रवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता ठाणे महापालिकेच्या सभापती निवडीचा मार्ग मोकळा होणार आहे. स्थायी समितीवर चार ते पाच वेळा निवडून आलेल्या ज्येष्ठ नगरसेवकांना संधी मिळणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
एक अनुभवी आणि दोन नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा होती. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सदस्यांची निवड करताना धक्कातंत्राचा वापर करत सर्वांचेच अंदाज चुकवले. सभागृहातील पक्षीय बलाबलानुसार स्थायी समितीत शिवसेनेचे सर्वाधिक नऊ, भाजपचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि एमआयएमचा प्रत्येकी एक सदस्य आहे.
कोणत्या पक्षाला किती जागा?
शिवसेनेकडून दिलीप बारटक्के, राजेश मोरे, पवन कदम, बाबाजी पाटील, संध्या मोरे, प्रमिला केणी, आदेश भगत, विक्रांत तांडेल आणि महेश साळवी यांची निवड करण्यात आली आहे. भाजपकडून भरत चव्हाण, मृणाल पेंडसे आणि कमल चौधरी यांना संधी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पल्लवी जगताप आणि यासीन कुरेशी, अजित पवार गटाकडून सुहास देसाई, तर एमआयएमकडून शोएब डोंगरे यांची निवड झाली आहे.
दिग्गज नगरसेवकांना धक्का
एकनाथ शिंदे यांनी स्थायी समितीवर शिवसेनेच्या सदस्यांची निवड करताना दिग्गज आणि चर्चेत असलेल्या नगरसेवकांना धक्का दिल्याची चर्चा आहे. सुधीर कोकाटे, विकास रेपाळे, राम रेपाळे, योगेश जानकर, रमाकांत मढवी, विमल भोईर आणि संजय भोईर अशा अनेकांना पहिल्या वर्षी संधी मिळालेली नाही. यापैकी अनेक जण स्थायी समिती सभापती पदाच्या शर्यतीत होते.
प्रदीप पूर्णकर हत्याप्रकरणामुळे एकनाथ शिंदे यांनी मीनाक्षी शिंदे यांनाही स्थायी समितीत स्थान दिले नाही, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात आहे. यंदा सदस्यांना कमी कालावधी मिळणार असल्याने आणि पुढील महिन्यात होणाऱ्या सभापती निवडणुकीत शिवसेनेचाच सभापती बसणार असल्याने, पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या या महत्त्वाच्या समितीवर प्रशासनावर पकड असलेल्या अनुभवी आणि नवीन नगरसेवकांची सांगड घातली जाईल, अशी चर्चा होती. मात्र, शिंदे यांनी स्थायी समितीवर अनपेक्षित नावांना संधी दिली आहे. त्यामुळे आता डावलण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये मोठी नाराजी उफाळण्याची चिन्हे आहेत.
Leave a Reply