मुंबईतील प्रभादेवी रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील रेल्वेच्या जागेवरील १०१ अतिक्रमित बांधकामांवर पश्चिम रेल्वेकडून गुरुवारी आणि शुक्रवारी हातोडा चालवण्यात येणार होता. त्यासाठी तोडकाम करणारे पथक मोठ्या पोलीस फौजफाट्यासह प्रभादेवी परिसरात दाखल झाले होते. पाडकामासाठी पथकाने स्वतःसोबत जेसीबीही आणले होते. मात्र स्थानिकांनी या कारवाईला जोरदार विरोध केला. त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे अजय चौधरी आणि मनसेचे बाळा नांदगावकरही रस्त्यावर उतरले होते. या नेत्यांनी फोनाफोनी करून ही कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला. येथील रहिवाशांचे पुनर्वसन करूनच येथील बांधकामे पाडावीत, अशी मागणी होती. परंतु तोडकामासाठी आलेले रेल्वेचे पथक आणि पोलीस ऐकायला तयार नव्हते.
शिंदेंचा फोन आणि कारवाई थांबली
अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना थेट फोन करून ही कारवाई थांबवली. त्यानुसार रेल्वेमंत्र्यांनी कारवाई तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले. यानंतर पाडकामासाठी आलेले जेसीबी प्रभादेवी परिसरातून निघून गेले. आता स्थानिक रहिवाशांना विश्वासात घेऊनच पुढील कारवाई करण्याची सूचना करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
पुनर्वसनावर भर
एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात सांगितले की, गेल्या आठवड्यात एसआरए, गृहनिर्माण विभाग आणि रेल्वे मंत्रालयाची बैठक झाली होती. त्या बैठकीत त्यांनी स्वतः रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली होती. हे रहिवासी ५० ते ६० वर्षांपासून तेथे राहत असून, ते काल परवाचे रहिवासी नाहीत. त्यांचे योग्य पुनर्वसन करावे लागेल, अशी भूमिका त्यांनी मांडली. रेल्वे विभाग आणि गृहनिर्माण विभाग मिळून त्यांचे पुनर्वसन करतील, असे ठरले होते. त्यानुसार रेल्वेचा आर अँड डी विभाग आणि एसआरए धोरण असे मिळून डीपीआर तयार केला आहे. तोपर्यंत ही कारवाई होऊ नये, अशी भूमिका मांडली होती. मात्र दुर्दैवाने रेल्वेचे अधिकारी त्याठिकाणी गेले. त्यानंतर शिंदे यांनी अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करून, असे ठरले असताना ही कारवाई होऊ नये, असे सांगितले. त्यावर रेल्वेमंत्र्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन कारवाई थांबवण्याचे आश्वासन दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.
Leave a Reply