बॉलिवूड अभिनेत्री अमृता रावची बहीण आणि टीव्ही अभिनेत्री प्रीतिका राव सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. ‘बेइंतहा’ आणि ‘लव्ह का है इंतजार’ यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या प्रीतिकाने नुकतंच लग्न केलं आहे. विशेष म्हणजे, कोणताही गाजावाजा न करता तिने अत्यंत साध्या आणि पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली आहे. तिच्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.
बंगळुरूमधील आश्रमात पार पडलं लग्न
प्रीतिकाने बंगळुरूमधील आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये विवाह केला. दक्षिण भारतीय तमिळ अय्यर परंपरेनुसार हा विवाहसोहळा पार पडला. या खास प्रसंगी कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते. आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनीदेखील या सोहळ्याला उपस्थिती लावत नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले. प्रीतिकाने सोशल मीडियावर लग्नाचे काही फोटो शेअर करत आपल्या आयुष्यातील या नव्या प्रवासाची माहिती दिली आहे.
कोण आहे प्रीतिकाचा नवरा?
प्रीतिकाने लग्नाचे फोटो शेअर केले असले तरी पतीची ओळख मात्र दाखवली नाही. तिने फोटोंमध्ये पतीचा चेहराही ब्लर केला आहे. प्रीतिकाच्या म्हणण्यानुसार, तिची आणि पतीची ओळख एका आध्यात्मिक कार्यक्रमात झाली होती. विशेष म्हणजे, तिचे काका आणि पतीचे कुटुंबीय यांच्यात पूर्वीपासून मैत्रीचे संबंध होते. तिचे पतीदेखील लहानपणापासून तिच्या काकांना ओळखत होते. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर दोघांच्या विचारांमधील समानता आणि आध्यात्मिक आवड यामुळे त्यांचे नाते अधिक घट्ट झाले.
अभिनयाला रामराम करत आध्यात्मिकतेकडे वळली प्रीतिका
प्रीतिकाने २०१८ नंतर अभिनय क्षेत्रापासून काहीसे अंतर घेतले. ‘बेइंतहा’ या मालिकेतील आलिया या भूमिकेमुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली होती. मात्र, अभिनय क्षेत्रात काम करण्याचा अनुभव चांगला असतानाही तिने करिअरची दिशा बदलण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तिने पॉडकास्ट आणि मुलाखती सादर करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांत तिचा कल आध्यात्मिकता, ज्योतिषशास्त्र आणि भारतीय संस्कृतीशी संबंधित विषयांकडे वाढला आहे. श्री श्री रविशंकर यांच्या मुलाखतीपासून तिने आध्यात्मिक पॉडकास्टचा प्रवास सुरू केला होता.
Leave a Reply