देशांतर्गत टी-२० क्रिकेटमधील महत्त्वाची स्पर्धा असलेल्या सैयद मुश्ताक अली ट्रॉफीचे सामने सुरू आहेत. या स्पर्धेत राज्य स्तरावरील युवा खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळते. झारखंड आणि कर्नाटक यांच्यातील सामन्यात विराट सिंहच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर झारखंडने विजय मिळवला.
कर्नाटकचे १७४ धावांचे आव्हान
या सामन्यात कर्नाटकने प्रथम फलंदाजी केली. कर्नाटकच्या संघाने २० षटकांत १७४ धावा केल्या. प्रत्युत्तरात झारखंडने १९.१ षटकांत विजयी लक्ष्य गाठले. विराट सिंहने कर्नाटकविरुद्ध ३४ चेंडूत नाबाद ६० धावा केल्या. त्याने तीन षटकार आणि पाच चौकार मारले. त्याच्यासोबत कर्णधार अनुकूल रॉयनेही नाबाद ५४ धावा केल्या.
झारखंडने चार सामन्यांत मिळवलेला हा दुसरा विजय आहे. याआधीच्या सामन्यात झारखंडला बंगालकडून, तर त्याआधी राजस्थानकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
पंजाबचाही तामिळनाडूवर विजय
स्पर्धेतील दुसऱ्या एका सामन्यात पंजाबने मजबूत मानल्या जाणाऱ्या तामिळनाडू संघाला हरवले. पंजाबने हा सामना फक्त पाच धावांनी जिंकला. कार्तिक चड्ढा पंजाबच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने ३० धावा देऊन तीन बळी घेतले. कृष भगत आणि सुखदीप बाजवा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
Leave a Reply