बीड जिल्ह्यात महावितरणाच्या कामांमधील एक मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. गेवराई मतदारसंघात विद्युत विषयक दुरुस्तीच्या कामांसाठी आलेल्या १३ कोटी रुपयांच्या निधीच्या वापरात अनियमितता झाल्याचे चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून महावितरणच्या सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी या गैरप्रकाराची तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर झालेल्या चौकशीत निधीच्या वापरात गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
## चौकशीनंतर सहा जणांचे निलंबन
या प्रकरणात महावितरणाचे अधीक्षक अभियंता प्रेमसिंग राजपूत, कार्यकारी अभियंता सुबोध डोंगरे यांच्यासह अभियंता कुंभार, गोरे, प्रधान व गुंजाळ यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत. निलंबनाची ही कारवाई झाल्यानंतर या प्रकरणाने राज्यभरात लक्ष वेधले आहे.
दरम्यान, संबंधित एजन्सीवरही कारवाई करावी आणि या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आमदार विजयसिंह पंडित यांनी केली आहे.
## आमदारांचा इशारा: दोषींवर कठोर कारवाई करा
निलंबनाच्या कारवाईनंतर तक्रारदार आमदार विजयसिंह पंडित यांनी प्रशासनावर टीका केली. ही कारवाई केवळ वरवरची असून ती एकाच तालुक्यापुरती मर्यादित असल्याचे त्यांनी म्हटले. शिरूर कासार, पाटोदा तसेच जिल्ह्यातील इतर ठिकाणीही अशाच प्रकारचा गैरप्रकार झाल्याचा आरोप त्यांनी केला. यामध्ये काही बड्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही पंडित म्हणाले.
या संपूर्ण प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागल्याशिवाय आणि दोषींवर कठोर कारवाई झाल्याशिवाय आपण शांत बसणार नाही, असा इशारा आमदार पंडित यांनी दिला आहे.
Leave a Reply