ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे व्हॉट्सॲप खाते हॅक झाल्याप्रकरणी पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे. या प्रकरणाची चौकशी आता विशेष तपास पथकाकडून करण्यात येणार आहे. याआधीच सायबर पोलीस ठाण्यात माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सोमवारी मोबाईल हँडसेट बदलला होता. तो मंगळवारी अज्ञात सायबर भामट्याने हॅक केला. त्यानंतर काही काळ खात्यावरून आक्षेपार्ह व्हिडिओही पाठवण्यात आले. मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास हा प्रकार समोर आला. या घटनेने राज्यातील पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
तपासासाठी एसआयटी स्थापन
महाराष्ट्र सायबर सेल या प्रकरणाचा तपास करणार आहे. हॅकिंगमागील सूत्रधार कोण, आयुक्तांचे खातेच का लक्ष्य करण्यात आले आणि आक्षेपार्ह व्हिडिओ पाठवण्यामागचा हेतू काय, या सर्व बाबींचा तपास करण्यासाठी सहा जणांचे विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकात दोन वरिष्ठ अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलीस उपायुक्त पराग मणेरे आणि ठाणे सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश वारके यांच्याकडे तपासाची धुरा राहणार आहे.
पोलिसांसमोरच सायबर भामट्यांचे आव्हान
पोलीस आयुक्तांचे व्हॉट्सॲप खाते हॅक झाल्याने महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ उडाली आहे. सायबर भामट्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिल्याचे मानले जात आहे. या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. खाते हॅक करणाऱ्यांचा शोध घेण्यासोबतच त्यामागील तांत्रिक यंत्रणा आणि संभाव्य हेतू उघड करण्यावर एसआयटीकडून भर दिला जाईल. या तपासातून सायबर सुरक्षेतील त्रुटी आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनाही स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
सायबर पोलिसांकडून पथकांची निर्मिती करून तपास सुरू करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
Leave a Reply