नोकरी सोडल्यानंतर ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी पाच वर्षांची सेवा पूर्ण करणे आवश्यक असते, अशी अनेकांची समजूत आहे. चार वर्षे किंवा साडेचार वर्षे सेवा करून नोकरी सोडली, तर कंपनीकडून एक रुपयाही मिळणार नाही, असेही अनेकांना वाटते. मात्र कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या एका महत्त्वाच्या निकालामुळे या समजुतीला छेद गेला आहे. पाच वर्षे पूर्ण होण्याआधीच नोकरी सोडणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिला असून, संबंधित कंपनीला ग्रॅच्युइटीसह त्यावरील व्याज देण्याचे आदेश दिले आहेत.
नेमके प्रकरण काय होते?
बेंगळूर मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये कार्यरत असलेल्या एका माजी सहाय्यक अभियंत्याने ६ जुलै २०१७ रोजी नोकरी सुरू केली होती. त्यांनी १९ मार्च २०२२ रोजी राजीनामा दिला आणि १८ एप्रिल २०२२ रोजी ते सेवेतून मुक्त झाले. त्यांचा एकूण कार्यकाळ चार वर्षे, नऊ महिने आणि बारा दिवसांचा होता.
या कर्मचाऱ्याने शेवटच्या पगाराच्या आधारावर सुमारे १.८५ लाख रुपयांची ग्रॅच्युइटी मागितली होती. मात्र पाच वर्षांची सेवा पूर्ण झालेली नसल्याचे कारण देत कंपनीने ही रक्कम देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर हा वाद उच्च न्यायालयात पोहोचला. कर्मचाऱ्याने न्यायालयात युक्तिवाद केला की, नोकरीच्या पाचव्या वर्षात त्यांनी २४० दिवसांपेक्षा जास्त काळ काम केले आहे, त्यामुळे त्यांना ग्रॅच्युइटी मिळायला हवी.
न्यायालयाने काय म्हटले?
कर्नाटक उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती डी. के. सिंग आणि न्यायमूर्ती एच. शांती भूषण यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. खंडपीठाने कर्मचाऱ्याचे अपील मंजूर केले. ग्रॅच्युइटीची पात्रता ठरवताना केवळ कॅलेंडरवरील पाच वर्षे पाहणे पुरेसे नाही, तर त्या कालावधीत कर्मचाऱ्याने प्रत्यक्षात किती दिवस काम केले, हे पाहणे गरजेचे असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालयाने बेंगळूर मेट्रोला संबंधित कर्मचाऱ्याला १.७५ लाख रुपयांची ग्रॅच्युइटी आणि त्यावर १० टक्के वार्षिक व्याज देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पाच वर्षे पूर्ण होण्याआधी नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा निकाल दिलासादायक ठरू शकतो.
२४० दिवसांचा नियम काय आहे?
‘पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी ॲक्ट, १९७२’ च्या नियमांनुसार, काही विशिष्ट परिस्थितीत कर्मचाऱ्याने पूर्ण बारा महिने काम केले नसले, तरीही त्या कालावधीला ‘सलग सेवा’ म्हणून गणले जाऊ शकते. संबंधित बारा महिन्यांत किमान २४० दिवस काम केले असल्यास, एका वर्षाची सलग सेवा पूर्ण मानली जाते. आठवड्यातून पाच दिवस काम करणाऱ्यांसाठी हा नियम १९० दिवसांपर्यंत लागू होऊ शकतो.
त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याची सेवा पाच वर्षांपेक्षा थोडी कमी असली, तरी त्याने पाचव्या वर्षात पुरेसे दिवस काम केले असल्यास ग्रॅच्युइटीचा दावा करता येऊ शकतो, असा या निकालाचा अर्थ निघतो. मात्र प्रत्येक प्रकरणातील तथ्ये वेगळी असू शकतात, त्यामुळे असा दावा करण्यापूर्वी सेवेचा नेमका तपशील आणि संबंधित नियम तपासणे महत्त्वाचे ठरते.
Leave a Reply