एखाद्याने आपल्या कामाचे कौतुक केले, तरी अनेक तरुणांच्या मनात लगेच शंका निर्माण होते — ‘मी खरंच याला पात्र आहे का?’ इतरांना आपले कर्तृत्व दिसते, पण स्वतःला मात्र उणीवाच जाणवतात. आजच्या तरुण पिढीमध्ये ही भावना मोठ्या प्रमाणावर दिसून येते. यामागे ‘इम्पोस्टर सिंड्रोम’ आणि आत्म-शंका या दोन संकल्पना महत्त्वाच्या ठरतात.
इम्पोस्टर सिंड्रोम म्हणजे काय
इम्पोस्टर सिंड्रोम ही अशी मानसिक स्थिती आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीकडे मेहनत आणि क्षमता असूनही ती स्वतःला यशस्वी म्हणून स्वीकारू शकत नाही. इतरांना आपली खरी ओळख कळेल, अशी भीती अशा व्यक्तींना वाटते. त्यामुळेच प्रशंसा मिळाल्यानंतरही ती मनापासून स्वीकारता येत नाही. स्वतःला सतत श्रेष्ठ सिद्ध करण्याचा प्रयत्न मानसिकदृष्ट्या थकवणारा ठरतो.
सोशल मीडिया आणि अपेक्षांचा दबाव
सोशल मीडियामुळे इतरांचे आयुष्य रोज पाहायला मिळते. दररोज समोर येणाऱ्या व्यक्तींकडे आपल्यापेक्षा चांगली नोकरी, चांगले आयुष्य किंवा मोठी कामगिरी असल्याचे दिसते. त्यामुळे प्रशंसा मिळूनही इतर लोक आपल्यापेक्षा अधिक सुखी असल्याचे वाटू शकते. अनेक तरुण अगदी लहान चुकांनाही अवास्तव महत्त्व देतात. प्रशंसा मिळाल्यावर आता प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करावेच लागेल, असे त्यांना वाटते. त्यामुळे ते आपल्या यशाचे श्रेय स्वतःच्या मेहनतीऐवजी नशिबाला किंवा इतरांच्या मदतीला देतात.
नात्यांमधील अपेक्षा बदलताहेत
नात्यांमध्ये अपेक्षा असणे ही सामान्य गोष्ट आहे. कोणतेही नाते असो, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडून काहीतरी करण्याची किंवा भविष्याची अपेक्षा नेहमीच असते. अनेकांना वाटते की जोडीदाराने वेळ द्यावा, समजून घ्यावे आणि कठीण काळात पाठीशी उभे राहावे. मात्र आता अनेक तरुण नात्यांमध्ये मोठ्या अपेक्षा ठेवण्याऐवजी गोष्टी नैसर्गिकरित्या घडू देण्यास प्राधान्य देत आहेत. अपेक्षा जितक्या कमी, निराशा तितकी कमी, असा त्यांचा विश्वास आहे.
प्रत्येक यश हे कठोर परिश्रमाचे फळ असते, हे तरुणांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. स्तुतीला कमी लेखण्याऐवजी ती आनंदाने स्वीकारणे आणि आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे.
Leave a Reply