बदलती जीवनशैली, तासन्तास बसून करावे लागणारे काम आणि जीवनसत्त्वांची कमतरता असलेले अन्न यामुळे हाडांची झीज लवकर होण्याचे प्रमाण वाढले आहे. हाडे कमकुवत होण्याच्या तक्रारीही अलिकडे अधिक दिसू लागल्या आहेत. ही स्थिती जगभरात असली, तरी सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारतात गेल्या काही वर्षांत जनजागृती वाढल्यामुळे आणि आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यामुळे सांधेरोपण शस्त्रक्रियांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. सध्या सांधेरोपण शस्त्रक्रियेत अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक असून, २०२७ मध्ये भारत या क्षेत्रात अव्वल स्थानी पोहोचेल, असे सांगितले जात आहे.
सांधेरोपण म्हणजे काय?
सांधेरोपण ही एक आधुनिक वैद्यकीय उपचारपद्धती आहे. गुडघा, खुबा किंवा खांदा यांसारख्या सांध्यांची झीज झाल्यास किंवा सांधा गंभीररीत्या खराब झाल्यास त्याच्या नैसर्गिक भागाऐवजी कृत्रिम सांधा बसवला जातो. प्रामुख्याने ऑस्टिओआर्थरायटिस, वाढते वय, अपघात, सांध्यांना झालेली दुखापत आणि हाडांचे आजार यांमुळे ही शस्त्रक्रिया करावी लागते. या प्रक्रियेमुळे रुग्णाला वेदनांपासून आराम मिळतो, चालणे-फिरणे सोपे होते आणि जीवनमान सुधारण्यास मदत होते.
हाडांची झीज का वाढतेय?
सांधेरोपणाची वेळ प्रामुख्याने हाडांची अतिप्रमाणात झीज झाल्यामुळे येते. अलिकडच्या काळात अन्नधान्यात पूर्वीसारखा कस राहिलेला नाही. बदललेल्या जीवनशैलीने खाण्याच्या सवयी आणि जेवणातील पदार्थही बदलले आहेत. पौष्टिक पदार्थांऐवजी जंकफूडचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शरीरात ‘ड’ आणि ‘क’ जीवनसत्त्वाची कमतरता भासू लागली असून, तारुण्यातच हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण वाढले आहे. हाडांची झीज प्रामुख्याने वृद्धत्वात होते, असे मानले जायचे; परंतु आता तारुण्यातही हा प्रकार दिसू लागला आहे. तरुणांमधील व्यसनाधीनता आणि स्टेरॉइडच्या वापरामुळे रक्तात गाठी होतात, त्यामुळे हाडांना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही आणि हाडांची झीज लवकर होते. यात प्रामुख्याने गुडघा आणि खुब्याच्या सांधेरोपणाचे प्रमाण अधिक आहे. खेळाडूंमध्येही मैदानावरील अपघातांमुळे या शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात केल्या जातात.
सांध्यांचे आजार, अपघात आणि उपचारांविषयी वाढलेली जागरूकता ही या वाढीची प्रमुख कारणे आहेत. रोबोटिक तंत्रज्ञान आणि आधुनिक कृत्रिम सांध्यांमुळेही या उपचारांना अधिक स्वीकार्यता मिळत आहे. इंडियन जॉइंट रजिस्ट्रीच्या आकडेवारीनुसार, २००६ मध्ये सुमारे १,०१९ गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियांची नोंद होती. २०१९ मध्ये हा आकडा सुमारे २७ हजारांवर पोहोचला. २०२० ते २०२६ या काळात भारतात सांधेरोपणाची मागणी जगातील सर्वाधिक वेगाने वाढण्याचा अंदाजही संशोधनात व्यक्त करण्यात आला होता. डॉक्टरांच्या मते, सांध्यांच्या आजारांचे प्रमाण सुरुवातीपासूनच अधिक होते आणि आजही ते आहे. मात्र, आता निदान योग्य आणि वेळेत होऊ लागले आहे. अशा प्रकारच्या दुखण्यातील वेदना प्रचंड असतात. योग्य वेळी निदान झाल्याने रुग्णाला आवश्यकतेनुसार सांधेरोपणाचा सल्ला दिला जातो, त्यामागचे गैरसमज दूर केले जातात आणि तंत्रज्ञानामुळे ही प्रक्रिया सुलभ झाली असून त्याविषयी जनजागृतीही वाढली आहे.
Leave a Reply