आरोग्य विभाग सरकारी रुग्णालयांतील सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी तारांकित मानांकनाची पद्धत आणण्यावर भर देत आहे. रुग्णांना प्रत्यक्षात कोणत्या सुविधा मिळतात आणि उपचारांबाबतचा त्यांचा अनुभव कसा आहे, यावर रुग्णालयांचे मूल्यमापन होणार आहे. सुविधा उपलब्ध आहेत की नाही, एवढेच न पाहता त्या किती परिणामकारकपणे दिल्या जातात, हेही तपासले जाईल.
पाच निकषांवर मूल्यमापन
या मूल्यांकनात प्रामुख्याने पाच बाबींचा समावेश असेल. त्यामध्ये रुग्णालयातील स्वच्छता, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे रुग्णांशी वर्तन, आवश्यक तपासण्यांची उपलब्धता, औषधांचा पुरवठा आणि उपचारांनंतर मिळणाऱ्या सेवेचा दर्जा यांचा समावेश आहे. रुग्णांकडून थेट अभिप्राय घेऊन आरोग्यसेवेचे मूल्यमापन केले जाणार आहे. रुग्णालयातील स्वच्छतेची छायाचित्रे मागविणे, तसेच विशेष पथकांमार्फत अचानक तपासणी करणे अशा उपाययोजनांचाही विचार केला जात आहे. त्यामुळे रुग्णालयांमधील प्रत्यक्ष परिस्थिती आणि नोंदींमधील माहिती यांची पडताळणी करणे शक्य होणार आहे.
प्रसूती व शस्त्रक्रिया सेवांनाही महत्त्व
प्रसूती आणि शस्त्रक्रियांच्या सेवांचाही या मूल्यांकनात महत्त्वाच्या निकषांमध्ये समावेश करण्यात आला आहे. या सेवा यशस्वीपणे देण्यासाठी डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, रक्तपेढी, रुग्णवाहिका, विद्युत जनित्र आणि अन्य आपत्कालीन सुविधांमध्ये समन्वय आवश्यक असतो. त्यामुळे प्रसूती आणि शस्त्रक्रियांच्या कामगिरीवरून रुग्णालयाची एकूण कार्यक्षमता तपासली जाणार आहे. भारतीय सार्वजनिक आरोग्य मानके आणि राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानकांनुसार सुविधा विकसित करण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय उपकरणे, औषधे आणि उपचार सुविधा यांची उपलब्धता व गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला जाणार आहे.
रुग्णालयात गेल्यानंतर रुग्णांना स्वच्छ परिसर, डॉक्टर आणि कर्मचारी वेळेवर उपलब्ध होणे, आवश्यक तपासण्या होणे आणि योग्य औषधे मिळणे या मूलभूत अपेक्षा असतात. यासोबतच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून रुग्णांशी कशा प्रकारे संवाद साधला जातो, याचाही विचार मानांकनात केला जाणार आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांकडून प्रत्यक्ष अभिप्राय घेतला जाणार असून, स्वच्छतेची छायाचित्रे मागवण्याबरोबरच विशेष पथकांकडून अचानक भेटी देऊन प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे, असे आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी सांगितले. मानांकनाबरोबरच आढळलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी नियमित देखरेख आणि आवश्यक सुधारणा करणेही महत्त्वाचे ठरणार आहे.
Leave a Reply