जळगाव जिल्हा बँकेच्या जागावाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद चिघळला आहे. माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्यासाठी ओबीसी प्रवर्गाची जागा मागितली होती, मात्र वाटाघाटीत ती मिळू शकली नाही, असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी बुधवारी सांगितले. पाटलांना निवडणुकीतून माघार घेण्यास कोणी सांगितले, हे पक्षातील इतर नेत्यांनाही माहीत नाही, असा दावाही त्यांनी केला.
डॉ. पाटील यांनी मंगळवारी आरोप केला होता की गुलाबराव देवकर आणि संजय पवार यांनी आपला विश्वासघात केला. जिल्हा बँकेच्या जागावाटपात ओबीसीच्या चार जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचे आधीच ठरले होते आणि त्यानुसार आपण ओबीसी प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरला होता, असे पाटील म्हणाले होते. त्यावर उत्तर देताना पवार यांनी पलटवार केला.
पवारांचा पलटवार
आम्ही सतीश पाटलांचा घात केला नाही; उलट त्यांनी आमचा अपघात केला आहे, असे पवार म्हणाले. स्वतःच्या तालुक्यात ठराव न करणाऱ्या आणि आमदार अमोल पाटील यांच्याविरोधात भूमिका न घेणाऱ्या पाटलांनी आता आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला त्यांनी दिला. डॉ. पाटील हे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आमदार आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष राहिले आहेत. एवढा मोठा अनुभव असूनही त्यांनी स्वतःच्या पारोळा तालुक्यातून ठराव केले नाहीत आणि आयती असलेली ओबीसी प्रवर्गाची जागा मागत होते, असे पवार म्हणाले.
पारोळा तालुक्यात सतीश पाटील केवळ स्वतःसाठी पदे घेतात आणि सामान्य कार्यकर्त्यांसाठी कधीच काही मागत नाहीत, असा आरोपही पवार यांनी केला. पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकांनाही ते हजर राहत नाहीत, त्यामुळे इतरांकडे बोट दाखवण्यापेक्षा त्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे, असे पवार म्हणाले.
शिस्तभंगाची कारवाई?
चाळीसगाव पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाचे उमेदवार उभे केले होते. त्या वेळी डॉ. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध प्रचार केला, त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हायला हवी होती, असे पवार म्हणाले. याबाबत प्रदेशाध्यक्षांकडे परवानगी मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. पारोळा पालिकेत पाटलांची सून नगरसेवकपदासाठी उभी होती, मात्र तिला निवडून आणता आले नाही. सख्ख्या पुतण्याला जे जमले नाही, ते पक्षाला होणार का, असा प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला.
Leave a Reply