नंदुरबार जिल्ह्यात ग्रामीण भागातील शौचालयांची स्थिती सुधारण्यासाठी १९ नोव्हेंबरपासून ‘स्वच्छ शौचालय – गरिमामय भविष्य’ अभियान सुरू होत आहे. जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागातर्फे हे अभियान राबवले जात असून त्याची सांगता १० डिसेंबरला मानवाधिकारदिनी होणार आहे. याबाबतची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी दिली.
दरवर्षी १९ नोव्हेंबरला जागतिक शौचालय दिन साजरा होतो. यावर्षी संयुक्त राष्ट्र संघाने या दिनासाठी ‘सुरक्षित शौचालये, समान भविष्य’ ही संकल्पना निश्चित केली आहे. याच पार्श्वभूमीवर हे अभियान राबवले जात आहे.
शौचालयांची दुरुस्ती आणि देखभाल
अभियानांतर्गत ग्रामीण भागातील सार्वजनिक, सामुदायिक आणि संस्थात्मक शौचालयांची कार्यक्षमता, सुरक्षितता व सुलभता सुधारण्यावर भर दिला जाणार आहे. महिला, शालेय विद्यार्थिनी आणि दिव्यांग व्यक्तींच्या गरजांकडे प्राधान्याने लक्ष दिले जाईल. शौचालयांची गरजेनुसार तपासणी, दुरुस्ती व पुनर्स्थापना केली जाईल, तसेच संबंधित प्राधिकरणांच्या समन्वयाने देखभाल व दुरुस्ती यंत्रणा बळकट केली जाईल.
शाळा व्यवस्थापन समित्या, अंगणवाडी केंद्रे आणि ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ही कार्यवाही केली जाणार आहे. वैयक्तिक कुटुंबांना त्यांच्या घरगुती शौचालयांची दुरुस्ती व देखभालीसाठी प्रोत्साहित केले जाईल. प्रत्येक गावासाठी किती शौचालयांची आवश्यकता आहे, याचे मूल्यांकन केले जाईल आणि खड्डा शौचालये व सेप्टिक टँक शौचालयांचे अद्ययावतीकरण केले जाईल.
मैला गाळ व्यवस्थापन आणि जनजागृती
मैला गाळ व्यवस्थापन नियमांचे पालन व्हावे यासाठी आवश्यकतेनुसार यांत्रिक पद्धतीने गाळ उपसण्याचे मूल्यांकन व नियोजन केले जाईल. वर्तन बदल संवाद आणि जनजागृतीतून समुदायातील शौचालयांचा नियमित वापर वाढवण्यावर भर दिला जाईल. साबणाने हात धुण्याची सवय लागावी यासाठी उपक्रम राबवले जातील, तसेच सुरक्षित स्वच्छता, मैला गाळ व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती केली जाईल.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत ग्रामस्तरावर शाळा तसेच सर्व सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता आणि वैयक्तिक शौचालयांचा १०० टक्के वापर व्हावा, यासाठी सरपंच, शालेय व्यवस्थापन समित्यांचे अध्यक्ष व पदाधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना सहभागी करून घेतले जाणार आहे. अभियान यशस्वी करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल आणि जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक गणेश मोरे यांनी केले आहे. ग्रामीण भागात सार्वजनिक शौचालयांचा वापर वाढवणे हाच अभियानाचा उद्देश असून शौचालयांची दुरुस्ती, यांत्रिक पद्धतीने गाळ उपसणे आणि गावाला किती शौचालये हवीत याचे मूल्यांकन यावर भर दिला जाणार आहे, असे मोरे यांनी सांगितले.
जिल्ह्यात यावर्षी शौचालय निर्मितीचे उद्दिष्ट ३४७ असून त्यापैकी ३०५ शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, तर ४२ शौचालये प्रगतिपथावर आहेत. वैयक्तिक शौचालयांचे उद्दिष्ट २३ हजार २२९ असून १३ हजार ९०३ शौचालये बांधून पूर्ण झाली आहेत आणि ९ हजार ३२६ शौचालयांचे काम सुरू आहे.
Leave a Reply