नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील फेस गावात चिकनगुनियासदृश आजाराच्या रुग्णसंख्येत सतत वाढ होत आहे. वाल्मीक चौक परिसरात ताप, सांधेदुखी आणि अंगदुखीने त्रस्त असलेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात असून, प्रत्येक घराचे सर्वेक्षण केले जात आहे.
काही दिवसांपासून फेस येथील वाल्मीक चौक व आदिवासी वस्तीतील ३० ते ४० जणांना ताप, सांधेदुखी आणि अंगदुखीचा त्रास होत होता. यातील काही जणांनी वडाळी, शहादा आणि दोडाईचा येथील खासगी दवाखान्यांत उपचार घेतले, तर काहींनी वडाळी येथील आरोग्य केंद्रात उपचार केले. रुग्णांची वाढती संख्या पाहता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्य पथकांच्या माध्यमातून ४ नोव्हेंबरला कंटेनर सर्वेक्षण सुरू केले होते. बुधवारी नऊ रुग्णांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. सध्या गावात सहा आरोग्य कर्मचारी सर्वेक्षण करत आहेत.
उपकेंद्र असूनही खासगी उपचारांकडे ओढा
फेससह परिसरातील गावांतील रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत म्हणून गावात उपकेंद्र आहे. त्यात सामुदायिक आरोग्य अधिकारी, परिचारिका आणि आशासेविका उपलब्ध आहेत. तरीही बहुसंख्य रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे दिसून येत आहे.
४९० पैकी १२२ घरांचे सर्वेक्षण पूर्ण
गावातील ४९० पैकी १२२ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. प्रत्येक घराचे सर्वेक्षण सुरू असून, लक्षणे असलेल्या रुग्णांचे रक्तनमुने घेतले जात आहेत. तपासणीसाठी हे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. सध्या प्राथमिक स्वरूपात रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नारायण बावा यांनी दिली.
Leave a Reply