गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

नांदगावात फायबर केबल खोदाईमुळे पाणीपुरवठा ठप्प

नांदगावात फायबर केबल टाकताना झालेल्या खोदाईमुळे मुख्य जलवाहिनी फुटली असून दीड महिन्यांपासून अनेक वसाहती पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत, नागरिक त्रस्त आहेत.

नांदगावात फायबर केबल खोदाईमुळे पाणीपुरवठा ठप्प

नांदगाव शहर आणि परिसरात इंटरनेटसाठी फायबर ऑप्टिक केबल टाकण्याचे काम सुरू असताना झालेल्या बेफिकीर खोदाईमुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. नगरपरिषदेच्या हद्दीत केबल टाकण्यासाठी कंपन्यांनी ७५ लाख रुपयांची अनामत जमा केली असली, तरी लगतच्या ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावर आवश्यक परवानग्या न घेताच खोदाई करण्यात आल्याचे समोर आले आहे.

शिवसृष्टीकडे जाणाऱ्या कोल्ह्या-लवणाजवळ झालेल्या या खोदाईसाठी कोणतीही बँक गॅरंटी किंवा सुरक्षा अनामत भरण्यात आलेली नाही. त्यामुळे एकाच परिसरात दोन वेगवेगळ्या हद्दींमध्ये नियमांची अंमलबजावणी वेगळी का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

जलवाहिनी फुटल्याने कृत्रिम टंचाई

खोदाईदरम्यान पाणीपुरवठ्याची मुख्य जलवाहिनी पूर्णपणे बाधित झाली. त्यामुळे संबंधित वसाहतींचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याचे दुर्भिक्ष असताना खोदाईच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांवर कृत्रिम पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून अनेक भागांतील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत आहेत.

ज्या ठेकेदारामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, तो ठेकेदार नागरिकांचे फोनही उचलत नसल्याने दुरुस्तीचे काम रखडले आहे. जलवाहिनी एका विभागाची, महामार्ग दुसऱ्या प्राधिकरणाचा आणि नुकसान करणारा ठेकेदार संपर्काबाहेर असल्याने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाची मोठी कोंडी झाली आहे.

दिलेल्या हमीची पायमल्ली

एका कंपनीने परवानगी मागताना मुख्याधिकाऱ्यांना लेखी हमी दिली होती की रस्त्यालगत कमीत कमी खोदाई केली जाईल आणि खोदाई व पुनर्स्थापना करताना सार्वजनिक सुरक्षितता व वाहतुकीला होणारा त्रास कमी ठेवला जाईल. केवळ ७५ मीटर अंतरावर १.५ मीटर बाय १.० मीटर आकाराचे मोजकेच खड्डे खोदले जातील, असेही कंपनीने म्हटले होते. प्रत्यक्ष कामात मात्र या सर्व अटींची पायमल्ली झाल्याचे दिसून येत आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance