लाटीपाडा धरणातून उजव्या कॅनलद्वारे काटवान परिसरातील शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देत तीन आवर्तने सोडावीत, अशी मागणी काटवान परिसरातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे उपजिल्हाधिकारी संदीप पाटील यांच्याकडे केली आहे.
पावसाचे प्रमाण कमी, पाण्याची टंचाई
काटवान परिसरात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाअभावी जमिनीतील पाण्याची पातळी खालावली असून रब्बीतील पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी लाटीपाडा धरणाच्या उजव्या कॅनलद्वारे पाणी सोडणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे.
चारा पिकविण्याचाही प्रश्न मार्गी लागणार
धरणातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करून काटवान परिसरातील शेतकऱ्यांना किमान तीन आवर्तने मिळावीत, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. शेतीला पाणी उपलब्ध झाल्याने चारा पिकविण्याचा प्रश्नही मार्गी लागू शकतो. त्यामुळे जलसंपदा विभागाने तातडीने पाणी सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
प्राध्यापक युवराज काकुस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी निंबा जाधव, प्रभाकर कुवर, मोतीराम कुवर, भास्कर कुवर, एन. डी. जाधव, विजय कुवर, नवल जाधव, श्रीराम कुवर, सुखदेव कुवर, विनोद कुवर, विलास जाधव, देवीदास कुवर आदी उपस्थित होते.
Leave a Reply