मुळशी तालुक्यातील प्रमुख पिकांचे २० टक्के सर्वेक्षण आणि ग्राउंड ट्रुथिंग करून म्हणजेच प्रत्यक्ष पंचनामे करण्याचे आदेश शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने दिले आहेत. मंडळनिहाय अहवाल तात्काळ शासनाकडे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. ही माहिती आमदार शंकर मांडेकर यांनी दिली.
दुष्काळ जाहीर न झाल्याने सवलती नाहीत
अपुरा पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामातील पिकेही हातची जाण्याची भीती आहे आणि पाणीटंचाई आत्तापासूनच जाणवू लागली आहे. तरीही तालुक्यात दुष्काळ जाहीर झालेला नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या दुष्काळी सवलती लागू झालेल्या नाहीत. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून मांडेकर यांनी दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून वगळलेल्या मुळशी तालुक्याचा ट्रिगर-३ अंतर्गत समावेश व्हावा, अशी मागणी केली होती.
मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
या मागणीसाठी मांडेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद आबा पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद आबा पाटील यांची समक्ष भेट घेऊन त्यांनी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती दिली होती.
पर्जन्यमानाची आकडेवारी
तालुक्यात जून महिन्यात ८८.५० पाऊस झाला, तर सरासरी २७८.६० आहे. जुलैमध्ये ११४८.५० पावसाची नोंद झाली, तर सरासरी ६४५.५० आहे. ऑगस्टमध्ये २३६.२० पाऊस झाला, तर सरासरी ४६३.४० आहे. सप्टेंबरमध्ये ९८.४० पाऊस झाला, तर सरासरी १८५.७० आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत पाऊस शून्य राहिला, तर सरासरी ८२.१० आहे.
राज्य शासनाने आता नव्याने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर अहवालाच्या माध्यमातून मुळशी तालुक्यातील दुष्काळाची वास्तविक परिस्थिती समोर येईल आणि शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त तालुका म्हणून सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास आमदार मांडेकर यांनी व्यक्त केला आहे.
Leave a Reply