सोमवारी आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवत त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणातील आरोपींना वाचवले जात असल्याचा दावा त्यांनी केला होता. व्हीएसआर कंपनीच्या मालकाच्या मालमत्तेवरून आणि गुन्हेगारी जगताशी असलेल्या संबंधांवरूनही त्यांनी मोठे आरोप केले. या दाव्यानंतर भाजपच्या गोटातून ही राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यावर भाष्य करावे, अशी मागणीही होत होती. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सुळे यांनी काय सांगितले
रोहित पवार यांनी व्हिडिओमध्ये जे पाहिले ते आपल्याला माहिती नाही, असे सुळे म्हणाल्या. पक्षाची भूमिका आपण काल पुण्यात सविस्तरपणे मांडली असल्याचे त्यांनी सांगितले. रोहित पवार यांनी स्वतः हे मत मांडले आहे. यात पाठिंब्याचा प्रश्नच येत नाही, कारण हे काही धोरण नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. आपण संपूर्ण पत्रकार परिषद पाहिलेली नाही. वर्तमानपत्रात आलेले आपण वाचले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. या विषयावर आपल्यापेक्षा देशात अनेक तज्ज्ञ आहेत. तांत्रिकदृष्ट्या आपण यावर उत्तर देऊ शकत नाही, असेही सुळे म्हणाल्या. रोहित पवार यांनी पक्ष म्हणून पत्रकार परिषद घेतलेली नाही. त्यांनी स्वतः वैयक्तिक मत मांडले आहे, असे मोठे वक्तव्य सुळे यांनी केले.
अहवालाची प्रतीक्षा, शेतकऱ्यांची मागणी
व्हीएसआर कंपनी आणि अपघाताच्या विषयावर बोलताना सुळे म्हणाल्या की, आपण नागरी विमान वाहतूक तज्ज्ञ नाही, त्यामुळे यावर आपण काही सांगू शकत नाही. रोहित पवार आणि उमेश पाटील या दोघांचा उल्लेख होत आहे. उमेश पाटील यांचा पक्ष सरकारमध्ये आहे. रोहित पवार यांनी देशाच्या गृहमंत्र्यांकडे त्या अहवालाची मागणी केली आहे. त्या अहवालाची आपण सर्वजण वाट पाहूया, अशी भूमिका सुळे यांनी मांडली. मतदारसंघ पुनर्रचनेच्या विषयावरही सुळे यांनी भूमिका मांडली. पुनर्रचनेची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांनी सार्वजनिकपणे विरोध केला, त्यांनी आपल्याला फोन केला होता. किती लोकांनी विधेयक वाचले आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला. नताशा आव्हाड लंडनमध्ये असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला सांगितले. जितेंद्र आव्हाड हे पक्षाचे नेते आहेत. त्यांचे मत यापूर्वीही घेतले गेले आहे आणि पुढेही घेतले जाईल. पक्षाच्या प्रत्येक घडामोडीत त्यांचे मत घेतले जाते, असे सुळे म्हणाल्या. राज्यात मोठा दुष्काळ असल्याचे सांगत सुळे यांनी शेतकऱ्यांसाठी हेक्टरी एक लाख रुपयांच्या मदतीची मागणी केली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना याविषयी दोन पत्रे दिली आहेत. अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे. पाणी वाटप योग्य झाले पाहिजे. मुलांच्या शाळा आणि महाविद्यालयांचे शुल्क माफ झाले पाहिजे. ही राजकारण करण्याची वेळ नाही, असे सुळे म्हणाल्या. सरकारने अतिशय संवेदनशीलपणे वागावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. काल आपण बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. जे शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत, त्यांच्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे. निदर्शनास येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला तातडीने मदत केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती सुळे यांनी दिली.
Leave a Reply