महाराष्ट्रात सध्या दुष्काळाचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अनेक महत्त्वाचे निर्णय घेत आहे. त्याच मालिकेत सरकारने आणखी एक मोठी योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरपालिकांच्या पाणीपुरवठा व मलनिःसारणासाठीची सहायक अनुदान योजना बंद करण्यात आली आहे.
राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून नगरपालिकांसाठीची सहायक अनुदान योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. योजनांच्या सुसूत्रीकरणांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.
योजना का बंद करण्यात आली?
नगरपालिकांच्या पाणीपुरवठा व मलनिःसारण योजनांसाठीच्या सहायक अनुदानाचे लेखाशीर्ष 2215 8973 बंद करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व मलनिःसारण योजनांसाठी समान उद्देशाच्या दोन स्वतंत्र अनुदान योजना कार्यरत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
ग्रामीण भागातील योजना सुरूच राहणार
शहरी भागातील पाणीपुरवठा व मलनिःसारणाची कामे नगरविकास विभागाच्या माध्यमातून अमृत आणि नगरोत्थान महाअभियानांतर्गत हाताळली जातात. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व मलनिःसारण योजनांसाठी लेखाशीर्ष 2215 A014 अंतर्गत स्वतंत्र अनुदान योजना सुरूच राहणार आहे. योजनांची पुनरावृत्ती टाळणे आणि उपलब्ध निधीचा अपेक्षित परिणाम साधणे, हा सुसूत्रीकरणामागील मुख्य उद्देश आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारीतील नगरपालिकांसाठीची संबंधित सहायक अनुदान योजना बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
Leave a Reply