कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगरकरांना पुन्हा एकदा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. एमआयडीसीच्या बारवी जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सलग २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. एमआयडीसीच्या डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. राऊत यांनी १६ नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील अधिकृत सूचना जारी केली आहे.
कोणत्या भागांना फटका बसणार
या पाणीबंदचा फटका उल्हासनगर महानगरपालिका, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, डोंबिवली व तळोजा औद्योगिक क्षेत्र तसेच परिसरातील ग्रामपंचायतींना बसणार आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रांतून कल्याण पूर्व-पश्चिम, कल्याण ग्रामीण विभाग आणि डोंबिवली पूर्व-पश्चिम भागाला होणारा पाणीपुरवठा या कालावधीत बंद राहणार आहे. ऐन कामकाजाच्या दिवसांत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने गृहिणी, नोकरदार, व्यावसायिकांसह औद्योगिक क्षेत्रालाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
पाणीपुरवठा पूर्ववत करताना काही काळ कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे २४ तासांचा पाणीपुरवठा बंद संपल्यानंतरही लगेच नियमित दाबाने पाणी मिळेलच, असे नाही. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा त्रास आणखी काही काळ सहन करावा लागू शकतो. या वृत्ताला उल्हासनगर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुले आणि उपअभियंता दीपक ढोले यांनी दुजोरा दिला आहे.
दर गुरुवारी पाणी बंद; टँकरही मिळणार नाही
पुढील सूचना मिळेपर्यंत आठवड्यातील दर गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवार रात्री १२ वाजेपर्यंत २४ तास पाणीपुरवठा बंद राहील, असेही जाहीर करण्यात आले आहे. पाणीपुरवठा बंद असलेल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी महापालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी पाणी बंद होण्यापूर्वीच पिण्याच्या पाण्यासह दैनंदिन वापरासाठी आवश्यक पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Leave a Reply