आज १८ नोव्हेंबर रोजी जागतिक सीओपीडी दिन साजरा होत आहे. या निमित्ताने फुफ्फुसांच्या गंभीर आजाराबद्दल एक महत्त्वाचा इशारा समोर आला आहे. केवळ धूम्रपान करणाऱ्यांनाच फुफ्फुसांचा हा दीर्घकालीन आजार होतो, हा समज चुकीचा ठरत आहे. वाहनांचा धूर, औद्योगिक प्रदूषण, बांधकामांची धूळ आणि घरात चुलीवर स्वयंपाक करताना निघणारा धूर यांमुळे धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींनाही सीओपीडी होण्याचा धोका वाढत आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात वाढत चाललेले वायुप्रदूषण श्वसनसंस्थेसाठी चिंतेचा विषय बनले आहे. दमा आणि सीओपीडी असलेल्या रुग्णांना प्रदूषित हवेचा अधिक त्रास सहन करावा लागतो. शिवडी टीबी रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधीक्षक आणि ज्येष्ठ फुफ्फुसरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र टी. ननावरे यांनी श्वसनविकारांचे लवकर निदान करण्याचे महत्त्व स्पष्ट केले आहे. क्षयरोगातून बरे झालेल्या रुग्णांच्या फुफ्फुसांवरही प्रदूषणाचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
क्षयरोगातून बरे झाल्यानंतरही धोका कायम
क्षयरोगातून रुग्ण बरा झाला तरी काही जणांच्या फुफ्फुसांमध्ये फायब्रॉसिस, ब्रॉन्किएक्टेसिस किंवा श्वसनमार्गात कायमस्वरूपी अडथळे निर्माण होतात. अशा व्यक्तींना प्रदूषित वातावरणात खोकला, कफ आणि धाप लागण्याचा त्रास वाढू शकतो. सतत खोकला येणे, छातीत घरघर होणे आणि चालताना दम लागणे ही सीओपीडीची लक्षणे असू शकतात. त्याकडे केवळ वयामुळे होणारा त्रास म्हणून दुर्लक्ष करू नये, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मुंबईत सीओपीडीचे प्रमाण ६.८ टक्के
मुंबई आणि पुणे येथे करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय बोल्ड संशोधनानुसार ४० वर्षांवरील व्यक्तींमध्ये सीओपीडीचे प्रमाण अनुक्रमे ६.८ टक्के आणि ६.२ टक्के आढळले. मुंबईतील पी. डी. हिंदुजा रुग्णालयात २०१४-१५ दरम्यान करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत ३२६ व्यक्तींपैकी ३८ जणांना, म्हणजेच सुमारे १२ टक्के व्यक्तींना, पूर्वी निदान न झालेला सीओपीडी आढळून आला.
सीओपीडीचे निदान करण्यासाठी स्पायरोमेट्री ही महत्त्वाची तपासणी आहे. योग्य इनहेलर उपचार, धूम्रपानापासून दूर राहणे, लसीकरण आणि श्वसन पुनर्वसनामुळे रुग्णांचे जीवनमान सुधारू शकते. प्रदूषणाच्या काळात दमा आणि सीओपीडीच्या रुग्णांनी औषधे नियमित घेणे, प्रदूषण जास्त असताना बाहेरचा व्यायाम टाळणे आणि आवश्यकतेनुसार एन९५ मास्क वापरणे गरजेचे आहे. दीर्घकाळ खोकला किंवा धाप लागत असल्यास वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Leave a Reply