भारतीय क्रिकेट संघाचा व चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. खेळाडू म्हणून मैदानातील प्रवास अधिकृतपणे थांबवल्यानंतर धोनीने आपल्या खास शैलीत चाहत्यांसाठी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
धोनीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याच्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीतील काही अत्यंत सुवर्ण आणि संस्मरणीय क्षण पाहायला मिळत आहेत. या भावनिक पोस्टसाठी त्याने एका खास गाण्याची निवड केली आहे. चाहत्यांनी मला नेहमीच चुकीचे ठरवले, असे धोनीने पोस्टमध्ये म्हटले आहे.
तेच गाणे, तीच आठवण
या भावनिक पोस्टसाठी धोनीने निवडलेले गाणे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. विशेष म्हणजे, ऑगस्ट २०२० मध्ये जेव्हा त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती, तेव्हा देखील त्याने हेच गाणे वापरले होते. अमिताभ बच्चन यांच्या ‘कभी कभी’ या गाजलेल्या चित्रपटातील ‘मैं पल दो पल का शायर हूँ…’ हे लोकप्रिय गाणे त्याने आपल्या पोस्टमध्ये वापरले आहे.
आता सीएसकेचा मेंटॉर
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळख असलेल्या धोनीने निवृत्ती घेतली असली, तरी तो चेन्नई सुपर किंग्जसोबत राहणार आहे. आयपीएल २०२७ च्या हंगामापासून धोनीचा खेळाडू म्हणून मैदानातील प्रवास अधिकृतपणे संपला आहे. चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीने त्याला आगामी हंगामासाठी खेळाडू म्हणून रिलीज केले असून, आता तो संघाचा मेंटॉर म्हणून काम करताना दिसणार आहे. २००८ पासून आयपीएल सुरू झाले आणि धोनीने चेन्नईकडून खेळण्यास सुरुवात केली. आयपीएलच्या अगदी पहिल्या पर्वात झालेल्या लिलावात चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीने धोनीला विक्रमी आणि सर्वाधिक बोली लावून संघात सामील करून घेतले होते. धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने तब्बल पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.
Leave a Reply