पुण्याच्या रस्त्यांवर आता महिलाही प्रवासी वाहतुकीत आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. भारत टॅक्सी या सेवेशी पुण्यातील ३०० हून अधिक महिला चालक जोडल्या गेल्या आहेत. त्यांच्या या सहभागामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील एकूण चालकांची संख्या ६० हजारांच्या पुढे गेली आहे.
काही दिवसांपूर्वी ही संख्या ३५ हजारांच्या आसपास होती. कमी वेळात ती जवळपास दुप्पट झाली आहे. चालकांना प्रत्येक प्रवासावर कमिशन द्यावे लागत नाही आणि प्रवाशांना सरकारी दरानुसार स्पष्ट भाडे आकारले जाते, ही दोन कारणे या वेगवान वाढीमागे असल्याचे दिसते.
कमिशनमुक्त सेवा हेच मोठे आकर्षण
खासगी अॅपवरून गाडी बोलावताना गर्दीच्या वेळी भाडे दुप्पट-तिप्पट होते. शिवाय प्रत्येक प्रवासामागे चालकाकडून कमिशन वसूल केले जाते. या पद्धतीला कंटाळलेले अनेक चालक आता भारत टॅक्सीकडे वळत आहेत. या सेवेत चालकाकडून कोणतेही कमिशन किंवा अतिरिक्त शुल्क घेतले जात नाही, त्यामुळे चालकाला मिळणारे उत्पन्न पूर्णपणे त्याच्याकडेच राहते.
प्रवाशांच्या दृष्टीनेही हा बदल दिलासादायक आहे. गर्दीच्या वेळेतही भाड्यात वाढ होत नाही आणि कोणतेही छुपे शुल्क आकारले जात नाही. त्यामुळेच चालकांसह प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असल्याचे सेवेचे शहर प्रमुख मोहित मित्रा यांनी सांगितले.
प्रति किलोमीटर दर आणि सेवेचा विस्तार
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ही सेवा सरकारी दरानुसार दिली जात आहे. रिक्षासाठी प्रति किलोमीटर १८ रुपये, हॅचबॅकसाठी २४ रुपये, सिडानसाठी २५ रुपये आणि एसयूव्हीसाठी ३१ रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे.
ही सेवा केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या अखत्यारीतील सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेडच्या माध्यमातून चालवली जाते. खासगी अॅप कंपन्यांच्या मक्तेदारीला पर्याय देणे हा यामागचा उद्देश आहे. मुंबईत मिळालेल्या प्रतिसादानंतर आता पुण्यातही या सेवेचा विस्तार होत आहे.
Leave a Reply