उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे नेहमी त्यांच्या भाषणांमुळे आणि धडक कारवायांमुळे चर्चेत असतात. मुख्यमंत्री पदासह ते गोरखनाथ मंदिराचे महंतही आहेत आणि गोरखपीठाचे पीठाधीश्वर म्हणून काम पाहतात. त्यामुळे ते नेहमी भगव्या रंगाच्या वस्त्रामध्ये दिसतात आणि हाच पोषाख त्यांची ओळख बनला आहे. त्याचबरोबर त्यांच्या दोन्ही कानात सोन्याची कुंडलं असल्याचेही नेहमी दिसून येते.
नाथ पंथाची दीक्षा परंपरा
योगी आदित्यनाथ दोन्ही कानांत ही कर्णभूषणे घालतात, कारण त्यांचा संबंध नाथ पंथाच्या धार्मिक परंपरेशी आहे. त्यांनी नाथ पंथात दीक्षा घेतली आहे. या पंथात दीक्षेच्या वेळी कान टोचून कर्णभूषणे घालण्याची प्रथा आहे. ही कर्णभूषणे संन्यासी व्यक्तीची आध्यात्मिक ओळख, गुरु परंपरा आणि पंथाशी असलेल्या संबंधाचे प्रतीक मानली जातात.
कुंडलांचे वजन आणि किंमत किती?
२०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत गोरखपूर सदर विधानसभा जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना योगी आदित्यनाथ यांनी आपल्या कर्णभूषणांचे वजन जाहीर केले होते. निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची दोन्ही कर्णभूषणे सोन्याची आहेत. त्यांचे एकूण वजन २० ग्रॅम आहे, म्हणजेच एका कर्णभूषणाचे वजन १० ग्रॅम आहे. प्रतिज्ञापत्रात दोन्ही कानातल्यांची किंमत ४९,००० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले होते.
२०२२ मध्ये १० ग्रॅम सोन्याचा भाव ४६,००० ते ५२,००० रुपयांच्या दरम्यान होता. सध्या १० ग्रॅम सोन्याचा भाव सुमारे १,३६,००० रुपये आहे. त्यामुळे सध्याच्या किमतींच्या आधारे या कुंडलांच्या किमतीचा अंदाज लावल्यास ती किमान २,००,००० ते २.५ लाख रुपये असू शकते. सोन्याची किंमत त्याच्या शुद्धतेनुसार, म्हणजेच कॅरेटनुसार बदलू शकते, हेही लक्षात घ्यावे लागेल.
Leave a Reply