जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातील क्रांती चौकात मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास व्याजाच्या पैशांवरून सुरू असलेल्या वादातून गोळीबार झाल्याचा प्रकार घडला. पाच ते सहा तरुण दुचाकींवरून तेथे आले आणि त्यांनी हातात तलवारी घेऊन परिसरात दहशत माजवली. दोन गोळ्या झाडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सकाळी भांडण, सायंकाळी हल्ला
क्रांती चौकातील एका तरुणाचा अन्य एका तरुणासोबत व्याजाच्या पैशांवरून वाद सुरू होता. याच वादातून मंगळवारी सकाळी दोघांमध्ये भांडण झाले होते. त्यानंतर सायंकाळी पाच ते सहा तरुण दुचाकींवरून क्रांती चौकात आले. त्यांनी परिसरात गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, घटनास्थळी पोलिसांना गोळीबाराचे अवशेष आढळून आलेले नाहीत.
सीसीटीव्ही फुटेज आणि तपास
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यामध्ये काही तरुणांच्या हातात तलवारी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रांती चौकातील एका तरुणाला पोलिस ठाण्यात आणून त्याची चौकशी करण्यात आली. गोळीबार नेमका कोणी केला आणि तलवारी घेऊन आलेले तरुण कोण होते, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. शहरातील वर्दळीच्या परिसरात सायंकाळी घडलेल्या या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Leave a Reply