जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. माघारीच्या शेवटपर्यंत जागा देऊ असे सांगून उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास सांगितले आणि माघारीच्या अवघ्या १५ मिनिटे आधी एकही जागा नाही, असे सांगण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी केला आहे.
जिल्हा बँकेत मंगळवारी, १७ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता जिल्हाध्यक्ष पाटील, त्यांच्या पत्नीने आणि महाविकास आघाडीच्या इच्छुक उमेदवारांनी माघार घेतली. त्यावेळी बोलताना पाटील यांनी हा आरोप केला. निवडणुकीच्या जागा वाटपात निवडणूक सर्वपक्षीय होऊन बिनविरोध व्हावी, यासाठी महाविकास आघाडीला आधी तीन जागा देऊ, नंतर दोन जागा, नंतर एक जागा देऊ, असे महायुतीच्या नेत्यांनी सांगितले होते. मात्र माघारीच्या दिवशी मंगळवारी महायुतीने एकही जागा सोडली नसल्याचे लक्षात येताच पाटील यांनी संताप व्यक्त केला.
महिला मतदारसंघातून अर्ज भरण्यास सांगितले
जागा देण्याचे आमिष दाखवून पद्मजा राजीव देशमुख यांचाही अर्ज महिला मतदारसंघातून भरण्यास महायुतीने सांगितले होते. त्यामुळे आपल्याला जागा मिळणार असल्याची महाविकास आघाडीला खात्री वाटली. त्यामुळे आघाडीने इतर ठिकाणी अर्ज भरले आणि महायुतीने सांगितलेल्या ठिकाणावरून माघार घेतली. दुपारी पावणेतीन वाजता माघारी झाल्यानंतर महाविकास आघाडीला एकही जागा नसल्याचे सांगण्यात आले.
काँग्रेसने सांगितले होते की, भाजपबरोबर जाऊ नका. मात्र भाजप आपल्याला जागा देईल, अशी आशा होती. परंतु त्यांनी विश्वासघात केला, अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली.
Leave a Reply