जळगावात लेवा समाजाच्या एकजुटीसाठी विचारमंथन करण्यात आले. लेवा संघटन अभियान समन्वय समितीच्या वतीने आंतरप्रवाह विवाह सत्कार सोहळा आणि ‘सकल लेवा संघटन — समृद्धीच्या दिशा’ या विषयावरील तज्ज्ञांची गटचर्चा जळगावच्या धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी महाविद्यालयात नुकतीच झाली. समाजाच्या एकजुटीसाठी या चर्चेद्वारे मंथन करण्यात आले.
लेवा समाजातील विविध प्रवाह, संस्था व संघटनांना एका मंचावर आणून समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय विकासाची दिशा निश्चित करणे, हे या कार्यक्रमामागचे उद्दिष्ट होते. यावेळी माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे, आमदार सुरेश भोळे, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार तथा गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, निवृत्त सहायक पोलिस आयुक्त दत्तात्रय चौधरी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम पिंपळे आणि महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
एकाच मंचावर सर्व प्रवाह
कार्यक्रमाच्या प्रारंभी कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. ज्ञानेश्वर पाटील यांनी केले. आंतरप्रवाह विवाह सत्कारार्थींच्या वतीने चंद्रशेखर पाटील व निशा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर लेवा समाजातील आंतरप्रवाहातील विवाहितांचा सत्कार करण्यात आला.
‘वन कम्युनिटी, वन व्हिजन’चे सूत्र
समाजाने आपला इतिहास अभ्यासणे आणि सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एकसंघ होणे गरजेचे आहे, असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. सुरेश भोळे यांनी समाजाच्या आर्थिक विकासासाठी शेतीला केंद्रस्थानी ठेवण्याचे आवाहन केले. डॉ. उल्हास पाटील यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘वन कम्युनिटी, वन व्हिजन’ हे सूत्र स्वीकारण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन सोनिता वराडे, मंगला पाटील, डॉ. मिलिंद पाटील व डॉ. ज्योती भोळे यांनी केले, तर गटचर्चेचे निवेदन डॉ. ज्ञानेश्वर पाटील यांनी केले.
Leave a Reply