दिवाळी आणि छठपूजेनिमित्त रेल्वेगाड्यांना होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष गाड्यांच्या परिचालन कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, पुणे आणि हडपसर येथून उत्तर भारतातील गोरखपूर, दानापूर व रक्सौल या शहरांसाठी विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.
कोणत्या गाड्यांना मुदतवाढ
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-गोरखपूर विशेष (०१०७९) गाडीच्या फेऱ्या १७ ते २० नोव्हेंबरदरम्यान, तर गोरखपूर-मुंबई विशेष (०१०८०) गाडीच्या फेऱ्या १९ ते २२ नोव्हेंबरदरम्यान सुरू राहणार आहेत. पुणे-दानापूर विशेष (०१४४७) गाडीच्या परिचालनास १८ ते २२ नोव्हेंबरपर्यंत, तर दानापूर-हडपसर विशेष (०१४४८) गाडीच्या फेऱ्यांना २० ते २४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन
याशिवाय काही विशेष गाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार लोकमान्य टिळक टर्मिनस-दानापूर (०१०२९) ही गाडी २० नोव्हेंबरला, तर दानापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस (०१०३०) ही गाडी २२ नोव्हेंबरला धावेल. लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर (०१०४१) ही गाडी १९ नोव्हेंबरला, तर गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस (०१०४२) ही गाडी २१ नोव्हेंबरला अतिरिक्त फेरी करेल. लोकमान्य टिळक टर्मिनस-रक्सौल (०१०२१) ही गाडी २१ नोव्हेंबरला, तर रक्सौल-लोकमान्य टिळक टर्मिनस (०१०२२) ही गाडी २४ नोव्हेंबरला धावणार आहे. तसेच हडपसर-गोरखपूर (०१४५७) ही गाडी २० नोव्हेंबरला, तर गोरखपूर-हडपसर (०१४५८) ही गाडी २२ नोव्हेंबरला अतिरिक्त फेरी करणार आहे.
Leave a Reply