गोवा हे अनेक पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण आहे. तरुणाईला तिथला समुद्र किनारा, नाइट लाइफ आणि स्थानिक खाद्यसंस्कृती फार आवडते. अनेक जण तिथे मासे चवीने खातात. मात्र, तुम्ही शाकाहारी असाल आणि गोव्याला जाण्याचा बेत करत असाल, तर तिथल्या पाच स्थानिक शाकाहारी पदार्थांचा आस्वाद तुम्ही नक्की घेऊ शकता.
मशरूम आमटी आणि गोवन थाळी
गोव्यात नोव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यांत पर्यटकांची फार गर्दी असते. या काळात तुम्ही गोव्यात रस्त्यावरील विक्रीस असणाऱ्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. शाकाहारी व्यक्तीला मसालेदार मशरूम आमटीची चव नक्की आवडेल. खोबरे वापरून बनवलेली ही मशरूम आमटी हमखास आवडते. त्याचबरोबर तुम्ही गोवन थाळीचाही आस्वाद घेऊ शकता. या थाळीत खोबऱ्याचे पापड, व्हेज पुलाव, सॅलड, गोव्यातील भाज्या आणि दाळीचा समावेश असतो.
सोलकढी आणि खोबऱ्याचा हलवा
गोव्यातील पारंपरिक पदार्थांमध्ये सोलकढीचा आस्वाद घ्यायलाच हवा. सोलकढी ही कोकम आणि खोबऱ्यापासून बनवली जाते. त्यात काही मसाले, लसूण, हिरव्या मिरच्या आणि जिरा पावडरचा वापर केला जातो. गुलाबी रंगाची सोलकढी गोव्यासह कोकणातही प्रसिद्ध आहे. जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा असेल, तर गोव्यातील मिठाईही प्रसिद्ध आहे. खोबऱ्याचा वापर करून तयार करण्यात येणारा हलवा अनेकांच्या आवडीचा आहे. त्यामुळे गोव्याच्या सहलीत शाकाहारींनाही चवीचा भरपूर आनंद घेता येईल.
Leave a Reply