नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला बॉलिवूडमध्ये अनेक नवे चेहरे आले. त्यापैकी एक नाव म्हणजे फरहीन प्रभाकर. तिचा चेहरा माधुरी दीक्षितशी इतका मिळताजुळता होता की तिला माधुरीची हमशक्ल म्हटले जाऊ लागले. पदार्पणानंतर लगेचच तिच्याकडे मोठ्या चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. पण कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच तिने एक असा निर्णय घेतला, ज्यामुळे तिच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलली.
‘जान तेरे नाम’पासून सुरुवात
फरहीनचे खरे नाव फरहीन खान. १९९२ मध्ये ‘जान तेरे नाम’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. या चित्रपटात तिच्यासोबत रोनित रॉय होता आणि दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. त्यानंतर तिला उगवती तारा म्हणून पाहिले जाऊ लागले.
‘बाजीगर’ची ऑफर आणि नकार
पदार्पणानंतर लगेचच शाहरुख खानच्या ‘बाजीगर’ चित्रपटाची भूमिका तिला देण्यात आली होती. मात्र फरहीनने ही भूमिका नाकारली. ही भूमिका नंतर शिल्पा शेट्टीने साकारली आणि चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला. ‘बाजीगर’ऐवजी फरहीनने कमल हासन यांच्यासोबत ‘कलैयगन’ या तमिळ चित्रपटाची निवड केली, पण तो चित्रपट तिकीटबारीवर फारसा चालला नाही.
त्यानंतरही फरहीन हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करत राहिली. अक्षय कुमारसोबत ‘सैनिक’, ‘दिल की बाजी’ आणि ‘नजर के सामने’ या चित्रपटांत ती झळकली. ‘अग्नि प्रेम’, ‘फौज’ आणि ‘तहकीकात’ हे तिचे आणखी काही चर्चेत राहिलेले चित्रपट. याच काळात तिची ओळख माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांच्याशी झाली.
मनोज प्रभाकर यांच्याशी विवाह
१९९३ मध्ये फरहीन आणि मनोज प्रभाकर यांची भेट झाली आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्या वेळी मनोज प्रभाकर आधीच विवाहित होते आणि त्यांचा घटस्फोट झालेला नव्हता. १९९४ मध्ये दोघांनी गुपचूप विवाह केल्याचे म्हटले जाते. नंतर २००८ मध्ये मनोज प्रभाकर यांना पहिल्या पत्नीपासून घटस्फोट मिळाला आणि २००९ मध्ये त्यांनी फरहीनशी पारंपरिक हिंदू पद्धतीने पुन्हा विवाह केला. या दाम्पत्याला राहील आणि मानवांश अशी दोन मुले आहेत.
आज कुठे आहे फरहीन?
विवाहानंतर फरहीनने हळूहळू चित्रपटसृष्टीपासून अंतर राखायला सुरुवात केली. आज ती कुटुंबासह दिल्लीत स्थायिक असून शांत आयुष्य जगत आहे. दीर्घकाळ पडद्यापासून दूर राहिल्यानंतर तिने अलीकडेच जॉन अब्राहमच्या ‘द डिप्लोमॅट’ या चित्रपटातून पुनरागमन केले, मात्र त्या चित्रपटात तिची भूमिका अगदी छोटी होती.
Leave a Reply