हिवाळा हा कोकणातील ऐतिहासिक किल्ले फिरण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. ऑक्टोबर ते फेब्रुवारीदरम्यान आल्हाददायक हवामान, स्वच्छ आकाश आणि समुद्रावरून येणारी थंडगार हवा यामुळे किल्लेभ्रमंतीचा आनंद द्विगुणित होतो. कोकणात समुद्राच्या लाटांमध्ये उभे असलेले जलदुर्ग, डोंगरकड्यांवरील किल्ले आणि मराठ्यांच्या आरमाराचा इतिहास सांगणारे अनेक ठेवे आहेत. त्यापैकी सहा भव्य किल्ले हिवाळ्यात आवर्जून पाहावेत, असे सांगितले जाते.
## मुरुड-जंजिरा आणि कुलाबा
रायगड जिल्ह्यातील मुरुडजवळ अरबी समुद्रातील एका बेटावर मुरुड-जंजिरा किल्ला वसला आहे. शतकानुशतके झालेल्या हल्ल्यांनंतरही हा किल्ला कधीच जिंकला गेला नाही, म्हणून तो अजिंक्य म्हणून ओळखला जातो. सुरुवातीला स्थानिक कोळी बांधवांनी समुद्री चाच्यांपासून संरक्षणासाठी येथे लाकडी तटबंदी उभारली होती. १५६७ मध्ये मलिक अंबरने येथे मजबूत दगडी किल्ला बांधला. किल्ल्याला भक्कम तटबंदी आणि २२ बुरूज आहेत. किल्ल्यातील ऐतिहासिक तोफा आणि समुद्राचे विहंगम दृश्य पर्यटकांना आकर्षित करते.
अलिबाग समुद्रकिनाऱ्याजवळ समुद्रात असलेला कुलाबा किल्ला मराठ्यांच्या सागरी सामर्थ्याची आठवण करून देतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. किल्ल्याभोवती मजबूत दगडी तटबंदी आणि बुरूज असून आत मंदिरे, पाण्याची टाकी आणि ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात.
## कोर्लई, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग
रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावाजवळ डोंगराच्या कड्यावर वसलेला कोर्लई किल्ला इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे. १६व्या शतकात पोर्तुगीजांनी या भागात आपले वर्चस्व मजबूत करण्यासाठी किल्ल्याची उभारणी केली. जवळच असलेले कोर्लई दीपगृह आणि समुद्राचे दृश्य पर्यटकांसाठी आकर्षण आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीजवळ हर्णे बंदराच्या समुद्रात सुवर्णदुर्ग किल्ला आहे. समुद्रातील बेटावर बांधलेला हा किल्ला मराठ्यांच्या आरमारी सामर्थ्याचा महत्त्वाचा भाग होता. १६व्या शतकात विजापूरच्या सत्ताधीशांच्या काळात या किल्ल्याची सुरुवात झाल्याचे मानले जाते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण किनाऱ्याजवळ समुद्रात असलेला सिंधुदुर्ग किल्ला महाराष्ट्राच्या सागरी इतिहासातील महत्त्वाचा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय सत्तांच्या सागरी आक्रमणांना रोखण्यासाठी या किल्ल्याची उभारणी केली. १६६४ मध्ये किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि साधारण १६६७ पर्यंत ते पूर्ण झाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग हा कोकणातील प्रसिद्ध समुद्रकिनारी किल्ला आहे. पूर्वी या किल्ल्याला ‘घेरिया’ असे म्हटले जात होते. अरबी समुद्र आणि वाघोटण खाडीच्या परिसरातील त्याचे स्थान संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते. शिलाहार राजवंशातील राजा भोज द्वितीय यांच्या काळात १२व्या शतकात या किल्ल्याची उभारणी झाली.
Leave a Reply