कर्करोगाचे निदान झालेल्या रुग्णासाठी शस्त्रक्रिया हा उपचारांचा महत्त्वाचा टप्पा असतो. मात्र त्याच रुग्णाला मधुमेहही असेल, तर शस्त्रक्रियेनंतरची काळजी अधिक वाढते. रक्तातील साखर नियंत्रणात नसेल, तर शस्त्रक्रियेनंतर संसर्ग होण्याची शक्यता वाढते, जखम भरून यायला वेळ लागतो आणि काही गुंतागुंतही निर्माण होऊ शकते. त्यामुळे रुग्णाला रुग्णालयात अधिक दिवस राहावे लागू शकते. जागतिक मधुमेह दिनानिमित्त डॉक्टरांनी या विषयाकडे विशेष लक्ष वेधले आहे.
साखर नियंत्रणात नसल्यास काय धोका?
मधुमेहामुळे शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण सांभाळण्याची नैसर्गिक प्रक्रिया बिघडते. त्याचबरोबर शरीराची जखम भरून काढण्याची क्षमताही कमी होते. मुंबईतील एसएसओ रुग्णालयातील हेड अँड नेक कॅन्सर तज्ज्ञ डॉ. अमित चक्रवर्ती यांच्या मते, रक्तातील साखर दीर्घकाळ जास्त राहिल्यास रक्ताभिसरणावर परिणाम होतो, संसर्गाशी लढण्याची शरीराची ताकद कमी होते आणि खराब झालेल्या पेशी व ऊतींची दुरुस्ती मंदावते. कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर यामुळे जखमेला संसर्ग होणे, जखम भरायला उशीर होणे आणि काही वेळा अतिरिक्त उपचारांची गरज भासणे, अशा अडचणी येऊ शकतात.
म्हणूनच कर्करोगावरील उपचार सुरू करण्यापूर्वी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे, हा शस्त्रक्रियेच्या तयारीचा महत्त्वाचा भाग मानला जातो. मधुमेह कितपत नियंत्रणात आहे, हे जाणून घेण्यासाठी रुग्णांनी रक्तातील साखरेची तपासणी आणि एचबीएवनसी चाचणी करून घ्यावी. तपासणीच्या निष्कर्षांनुसार डॉक्टर मधुमेहाची औषधे, इन्सुलिनचे डोस, आहाराचे नियोजन आणि साखर तपासणीची वारंवारता यामध्ये योग्य बदल करू शकतात.
शस्त्रक्रियेपूर्वी आणि नंतर काय काळजी घ्यावी?
शस्त्रक्रियेपूर्वी आणि नंतर रक्तातील साखरेचे योग्य व्यवस्थापन केल्यास गुंतागुंत होण्याचा धोका कमी होतो आणि रुग्ण लवकर बरा होतो. मात्र साखर अगदी योग्य होईपर्यंत कर्करोगावरील उपचार विनाकारण पुढे ढकलू नयेत, असे डॉक्टर सांगतात. रुग्णाच्या परिस्थितीनुसार उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या चमूने योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे असते.
रुग्णांनी आपल्या वैद्यकीय इतिहासाची संपूर्ण माहिती शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना देणे गरजेचे आहे. मधुमेह किती वर्षांपासून आहे, अलीकडील साखरेची पातळी किती आहे, एचबीएवनसी चाचणीचे निष्कर्ष काय आहेत, कोणती औषधे सुरू आहेत, इन्सुलिन घेतले जाते का, तसेच मधुमेहामुळे मूत्रपिंडाचे आजार, नसांचे नुकसान, हृदयविकार किंवा जखम भरायला होणारा विलंब अशा समस्या आहेत का, हे डॉक्टरांना सांगावे. यापूर्वी शस्त्रक्रियेनंतर संसर्ग झाला असल्यास किंवा कोणत्याही औषधाची अॅलर्जी असल्यास त्याबद्दलही माहिती द्यावी. सध्या सुरू असलेल्या इतर औषधांची माहिती देणेही महत्त्वाचे आहे.
अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ. भाविक सगलानी यांच्या मते, शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णांनी स्वतःहून मधुमेहाची औषधे बंद करू नयेत किंवा त्यांचे डोस बदलू नयेत. शस्त्रक्रियेच्या वेळी औषधांमध्ये कोणते बदल करायचे, किती वेळ उपाशी राहायचे आणि रक्तातील साखरेची तपासणी कशी करायची, याबाबत उपचार करणारी डॉक्टरांची चमू योग्य सूचना देते.
शस्त्रक्रियेनंतर काही लक्षणांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जखमेभोवती वाढणारा लालसरपणा, सूज, जखमेतून असामान्य द्रव बाहेर येणे, ताप येणे, वेदना वाढणे किंवा जखम भरायला विलंब होणे ही धोक्याची लक्षणे असू शकतात. अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांना कळवावे, जेणेकरून सुरुवातीच्या टप्प्यातील गुंतागुंत गंभीर होण्यापासून रोखता येईल. शस्त्रक्रियेपूर्वी योग्य तयारी, डॉक्टरांशी नियमित संवाद आणि रक्तातील साखरेची वेळोवेळी तपासणी केल्यास शस्त्रक्रियेची सुरक्षितता आणि रुग्णाची रिकव्हरी अधिक चांगली होण्यास मदत होते.
Leave a Reply