दाक्षिणात्य अभिनेता धनुष राजकारणात उतरणार का, यावर सध्या वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. अशात अभिनेत्री साई पल्लवीने धनुषला एक खास विनंती केली असून तिची ही विनंती सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. धनुष आणि साई पल्लवी लवकरच ओएम: ऑपरेशन मोल या चित्रपटातून एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात साई पल्लवीने धनुषबद्दल ही इच्छा व्यक्त केली.
विजय यांचा दाखला देत विनंती
कार्यक्रमाला येताना रस्त्यावर अनेक राजकीय झेंडे दिसल्याचे साई पल्लवीने गंमतीने सांगितले. हा एखादा राजकीय मेळावा आहे की काय, असे आपल्याला वाटल्याचे ती म्हणाली. यानंतर तिने तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते विजय यांचा संदर्भ दिला. विजय यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर अभिनयापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्याप्रमाणे धनुषनेही अभिनय सोडू नये, अशी आपण आशा करत असल्याचे साई पल्लवी म्हणाली.
धनुषच्या अभिनयाचे कौतुक
धनुषच्या अभिनयाचे कौतुक करताना साई पल्लवीने त्याच्या चित्रपटांचा प्रेक्षकांवर होणारा परिणामही सांगितला. त्याच्या वास्तववादी भूमिका आणि तो प्रेक्षकांसमोर आणत असलेल्या कथा दीर्घकाळ लक्षात राहतात, असे तिचे म्हणणे आहे. धनुषच्या पोल्लाधवन चित्रपटानंतर अनेकांनी त्यातील नायकाची बाईक घेतली होती आणि त्याची स्टाईल कॉपी केली होती, असे उदाहरणही तिने दिले. तुम्ही कोणताही मार्ग निवडा, पण कृपया अभिनय सुरू ठेवा. नाहीतर आम्ही एका उत्तम कलाकाराला मुकू, अशी विनंती तिने शेवटी केली. दरम्यान, धनुषच्या राजकारणातील प्रवेशाबाबत सध्या केवळ चर्चा आणि अफवा असून त्याने स्वतः याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. ओएम: ऑपरेशन मोल या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार पेरियासामी यांनी केले आहे. या चित्रपटात धनुष एका गुप्त विशेष पथकातील अधिकाऱ्याच्या भूमिकेत, तर साई पल्लवी आयपीएस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
Leave a Reply