अजित पवार यांच्या विमान अपघात आणि मृत्यू प्रकरणावरून आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. रोहित पवारांकडून सातत्याने करण्यात येणाऱ्या आरोपांना भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. रोहित पवारांच्या आरोपांमध्ये तथ्य असायला हवे, असे दरेकर म्हणाले. केवळ प्रसिद्धीसाठी आणि राजकारणासाठी कोणत्याही थराला जाण्याचे विरोधकांचे धोरण असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आरोपांवर दरेकरांचे प्रत्युत्तर
या प्रकरणात रोहित पवार यांनाच चौकशीसाठी बोलवायला हवे, अशी मागणीही दरेकर यांनी केली. रोहित पवारांच्या डोक्यात प्रसिद्धीचा हव्यास आणि मस्ती इतक्या लवकर जाईल, असे आम्हाला वाटले नव्हते, असे दरेकर म्हणाले. त्यांनी आरोपांचा अतिरेक केला आहे. शरद पवार यांचे नातू असूनही ते आपल्या राजकीय परंपरेला मातीमोल करत आहेत, असा आरोप दरेकर यांनी केला. रोहित पवारांना संदर्भहीन बोलण्याची सवय झाली आहे, असेही ते म्हणाले.
रोहित पवार यांनी दाखवलेल्या विमानाशी संबंधित फोटो आणि आरोपांवरही दरेकर यांनी आक्षेप घेतला. संबंधित कंपनी अनेकांना विमानसेवा पुरवत असते. अशा परिस्थितीत केवळ एक फोटो दाखवून आरोप करणे योग्य नाही, असे दरेकर म्हणाले. रोहित पवारांनी केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी आणि त्यांनाही चौकशीसाठी बोलवावे. त्यातून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असेही त्यांनी सांगितले.
दरेकर यांनी रोहित पवारांवर वैयक्तिक टीकाही केली. त्यांच्या आरोपांमागे राजकीय हेतू असल्याचा दावा करत त्यांनी रोहित पवारांच्या विधानांचा निषेध आणि धिक्कार केला. उद्या आम्ही तोंड उघडले तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल, असा इशाराही त्यांनी दिला. अजितदादांबद्दल खरोखरच कळवळा होता, तर त्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला उपस्थित राहायला हवे होते, असे म्हणत रोहित पवारांच्या अनुपस्थितीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. मात्र सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या कार्यक्रमाला का उपस्थित नव्हते, याची माहिती आपल्याला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डिलिमिटेशनवरून काँग्रेसवर निशाणा
मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरूनही प्रवीण दरेकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी डिलिमिटेशनबाबत भूमिका मांडण्यापूर्वी शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भूमिका काय आहे, हे तपासून पाहावे, असा सल्ला दरेकर यांनी दिला. डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीतील एका जबाबदार नेत्याने भूमिका मांडली आहे. मात्र या विषयावर काँग्रेसने स्वतःचा इतिहासही तपासावा. काँग्रेसच्या काळातही अशा प्रकारच्या प्रक्रिया झाल्या होत्या, असे सांगत दरेकर यांनी सपकाळ यांना काँग्रेसचा इतिहास पाहण्याचा टोला लगावला.
एका प्रकल्पाच्या संदर्भात बोलताना दरेकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्रीवर बैठक घेऊन काही निर्णय घेतले होते. त्या निर्णयांबाबत काही संभ्रम निर्माण झाले होते. त्यामुळे त्याचा पाठपुरावा करण्यात आला. संबंधित प्रकल्पासाठी तब्बल नऊ वेळा टेंडर काढण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. भाड्याच्या मुद्द्यावरून काही मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार असल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.
Leave a Reply