मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

नवोदितांच्या सादरीकरणाने ६५ व्या नाट्य स्पर्धेची सुरुवात

६५ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचा प्रारंभ सोमवारी नाशिकमध्ये झाला. ‘अनुभव मंटप’ नाटकाला हाउसफुल दाद मिळाली; ४० नवोदित कलावंतांनी प्रथमच रंगमंच गाजवला.

नवोदितांच्या सादरीकरणाने ६५ व्या नाट्य स्पर्धेची सुरुवात

सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६५ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचा प्रारंभ सोमवारी (१६ नोव्हेंबर) सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात झाला. नाशिकमधील परशुराम साईखेडकर नाट्यगृहातील रंगमंचाचा पडदा उघडताच कलावंतांच्या सशक्त अभिनयाने नाट्यरसिकांची मने जिंकली. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी नाट्यगृह प्रेक्षकांच्या गर्दीने हाउसफुल झाले. विशेष म्हणजे, पहिल्या नाटकातून तब्बल ४० नवोदित कलावंतांनी प्रथमच रंगमंचावर पाऊल ठेवत आपल्या अभिनयाची छाप उमटवली.

उद्घाटन सोहळा

स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. या वेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सहायक संचालक आदेश जाधव, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, समन्वयक राजेश जाधव आणि सहसमन्वयक मीना वाघ उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. कैलास टापरे (संभाजीनगर), उल्का कुलकर्णी (संभाजीनगर) आणि शिवानंद चलवादी (सोलापूर) हे स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. केतकी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

‘अनुभव मंटप’मधून समतेचा विचार

स्पर्धेतील पहिली नाट्यकृती म्हणून वीरशैव तरुण संघाचे ‘अनुभव मंटप’ हे दोन अंकी नाटक सादर झाले. महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनकार्यावर आणि बाराव्या शतकातील ऐतिहासिक अनुभव मंटपाच्या घटनांवर आधारित या नाटकातून समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि मानवतेचा विचार प्रभावीपणे मांडण्यात आला. महात्मा बसवेश्वर यांनी तत्कालीन समाजातील जातिभेद, विषमता आणि स्त्री-पुरुष भेदभावाविरोधात उभारलेली चळवळ नाटकातून जिवंत करण्यात आली. स्त्रियांना समान अधिकार, शिक्षणाची संधी आणि स्वतःचे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य मिळावे, या पुरोगामी विचारांचा वेध नाटकाने घेतला.

या नाटकाचे लेखन ॲड. अरुण आवटे यांनी, तर दिग्दर्शन सुरेश गायधनी यांनी केले. अमित मुळे यांनी संगीत, नितीन हिंगमिरे यांनी नेपथ्य, माणिक कानडे यांनी रंगभूषा, वैशाली आवटे यांनी वेशभूषा, तर विनोद राठोड यांनी प्रकाशयोजनेची जबाबदारी सांभाळली. नाटकात सचिन वाडकर (राजा बिज्जळ), संजय सोनार (सेनापती), आनंद निकुंभ (मंत्री मंचण्णा), दुर्गेश भुसारे (नारायण) आणि मोहन आवटे (विष्णुभट) यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. वरद खरवंडीकर, सानवी आवटे, ईरा डोंगरे आणि अमय जेवरे या बालकलाकारांसह एकूण ४० नवोदित कलावंतांनी नाटकात सहभाग घेतला. पहिल्याच प्रयोगाला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि नवोदितांचा उत्साह यामुळे नाट्य स्पर्धेची सुरुवात संस्मरणीय ठरली. आजचे नाटक ‘पिवळी भिंत’ (विद्या सेवा संस्था) परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सायंकाळी ७ वाजता सादर होणार आहे.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance