नव्वदच्या दशकात आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अभिनेत्री सोनाली बेंद्रेभोवती अनेक वर्षांपासून एक चर्चा रंगत होती. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर तिच्या प्रेमात असल्याचा आणि तिच्याशी लग्न करू इच्छित असल्याचा दावा केला जात होता. इतकेच नाही, तर लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यास तिला पळवून नेईन, असेही त्याने म्हटल्याचा दावा अनेक वर्षांपासून सोशल मीडियावर केला जात होता.
सोनाली बेंद्रेने ‘दिलजले’, ‘सरफरोश’ आणि ‘हम साथ साथ हैं’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्या काळात तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते होते आणि त्यात शोएब अख्तरचाही समावेश असल्याचे म्हटले जात होते. या चर्चांवर मात्र स्वतः सोनालीने आणि शोएबनेही वेगवेगळ्या वेळी आपली भूमिका मांडली आहे.
सोनाली बेंद्रेने काय सांगितले?
शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये सोनाली बेंद्रेला शोएब अख्तरच्या कथित लग्नाच्या प्रस्तावाबद्दल विचारण्यात आले होते. त्यावेळी तिला आश्चर्य वाटले. शोएबने खरंच असे काही म्हटले होते का, असा प्रश्न तिने उपस्थित केला. ती म्हणाली, ‘त्यांनी खरंच असं म्हटलं होतं का? मला माहीत नाही की यात किती तथ्य आहे. त्या काळातही खोट्या बातम्या पसरवल्या जायच्या.’
शोएबने तिला पळवून नेण्याबद्दल केलेल्या कथित वक्तव्याचा उल्लेख झाल्यानंतरही सोनालीने आपल्याला याबद्दल खात्री नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, शोएब आपला चाहता होता, असे सांगितल्यावर तिने आनंद व्यक्त केला. ‘देवाचे आभार! माझं करिअरच लोकांच्या या प्रेमामुळे घडलं आहे’, असे ती म्हणाली होती.
शोएब अख्तरचे स्पष्टीकरण
दरम्यान, २०१९ मध्ये शोएब अख्तरने स्वतःच्या यूट्यूब चॅनेलवर व्हिडिओ शेअर करत या चर्चांवर स्पष्टीकरण दिले होते. सोनाली बेंद्रेबद्दल आपण कधीही असे काही बोललो नसल्याचे त्याने स्पष्ट केले होते. इतकेच नाही, तर आपण आयुष्यात कधीही सोनालीला भेटलो नसल्याचेही त्याने सांगितले होते.
शोएबने म्हटले होते की, सोनालीचा फोटो पाकिटात ठेवणे, तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करणे किंवा तिला पळवून नेण्याबद्दल बोलणे, या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून रंगत असलेल्या या चर्चांना दोघांनीही आपापल्या पद्धतीने पूर्णविराम दिला आहे.
Leave a Reply