नंदुरबारमध्ये ‘जनजाती’ गौरव दिन साजरा करण्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आदिवासींना ‘जनजाती’ संबोधने हे अपमानस्पद असून, याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी काँग्रेसचे खासदार ॲड. गोवाल पाडवी यांनी केली आहे. तर ‘जनजाती’ हा शब्द संविधानात असून, जनजाती गौरव दिनाला विरोध करणाऱ्यांवरच गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी भाजपच्या माजी खासदार डॉ. हीना गावित यांनी केली आहे. दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने जिल्ह्याचे राजकारण तापले आहे.
‘जनजाती’ शब्दावर आक्षेप : खासदार गोवाल पाडवी
देशभरात जनजाती गौरव सप्ताह साजरा केला जात आहे. मात्र आदिवासींना ‘जनजाती’ संबोधने अपमानास्पद आहे. त्यामुळे आदिवासींना जनजाती संबोधनाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जावेत, अशी मागणी ॲड. खासदार गोवाल पाडवी यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून जनजाती गौरव दिन साजरा होत आहे, असा आरोप त्यांनी केला. आदिवासींना जनजाती संबोधने गैर आहे. तसेच संविधानात अनुसूचित जमातीऐवजी आदिवासी शब्द वापरावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली.
‘जनजाती’ शब्द संविधानानुसारच : डॉ. हीना गावित
भारतीय संविधानात ‘जनजाती’ हा शब्द आहे. मात्र खासदार ॲड. गोवाल पाडवी यांना याची माहिती नाही, असे माजी खासदार डॉ. हीना गावित यांनी म्हटले आहे. त्यामुळे जनजाती गौरव दिन साजरा करण्यास विरोध करणारे खासदार ॲड. गोवाल पाडवी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी त्यांनी माध्यमांशी बोलताना केली. जनजाती गौरव दिवस संपूर्ण भारतात साजरा करण्याची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे, असे त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात अनुसूचित जमाती शब्दाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे खासदार ॲड. पाडवी यांनी संविधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये, असेही डॉ. हीना गावित यांनी म्हटले आहे.
Leave a Reply