आयुष्यात यशस्वी होण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता पुरेशी नसते. त्यासोबत शिस्त, सातत्य, मेहनत आणि ध्येयाप्रति समर्पणाची जोड असणे आवश्यक असते. त्यामुळे यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येकाने आपले आयुष्य शिस्तीत जगले पाहिजे, असा कानमंत्र आयआरएस अधिकारी अमरनाथ खुळे यांनी दिला.
टेंभुर्णी (ता. माढा) येथील रोटरी क्लबमध्ये माढा तालुका प्रशासकीय अधिकारी व मित्रपरिवाराच्या वतीने स्नेहमेळावा, सन्मान सोहळा आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात खुळे बोलत होते. प्रशासकीय सेवेत कार्यरत अधिकारी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांतील व्यक्तींना एकत्र आणण्याच्या उद्देशाने हा मेळावा आयोजित केला होता.
स्पर्धा परीक्षार्थींना मार्गदर्शन
या मेळाव्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, प्रशासकीय सेवेत कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत आणि स्वतःच्या अनुभवांतून काय शिकता येईल, याबद्दल त्यांनी माहिती दिली. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळविलेल्या गुणवंतांचा यावेळी सन्मानही करण्यात आला.
दोन पुस्तकांचे प्रकाशन
विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या दोन पुस्तकांचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. समाधान कोकाटे लिखित “राज्यघटना” (पॉलिटी) आणि ज्ञानज्योत ॲकॅडमीचे संचालक अजित चंदनकर लिखित “मराठी व्याकरण” ही ती पुस्तके आहेत.
या कार्यक्रमाला मंत्रालयाच्या उपसचिव नंदा खुळे-जाधव, जिल्हा कृषी अधिकारी प्रवीण चोपडे आणि विभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल पाटील यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंगनाथ भुजबळ यांनी केले, तर लेशपाल जवळगे यांनी आभार मानले.
Leave a Reply