लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलने जोरदार विजय मिळवत बँकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. काँग्रेस नेते धीरज देशमुख आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने बँकेची सत्ता आपल्या हातात घेतली आहे. या विजयानंतर धीरज देशमुख यांनी कार्यकर्त्यांसह मोठा जल्लोष केला.
सहकार विरुद्ध परिवर्तन असा सामना
या निवडणुकीत सहकार पॅनल आणि परिवर्तन पॅनलमध्ये मोठी टक्कर पाहायला मिळाली. सुरुवातीच्या १५ पैकी १२ जागांचे निकाल हाती आले होते. त्यामध्ये सहकार पॅनलचे ७ तर परिवर्तन पॅनलचे ५ उमेदवार विजयी झाले होते. शेवटी सहकार पॅनलने बहुमत मिळवत बँक आपल्या ताब्यात घेतली. या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.
कोणत्या मतदारसंघात कोण विजयी?
या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. प्रक्रिया उद्योग मतदारसंघातून धीरज देशमुख यांनी १५ मते मिळवत दणदणीत विजय मिळवला, तर त्यांच्या विरोधातील परिवर्तन पॅनलचे भरत चामले यांना केवळ २ मते मिळाली.
उदगीर सोसायटी मतदारसंघातून सहकार पॅनलच्या प्रीती चंद्रशेखर भोसले यांनी १० मतांनी विजय मिळवला. तर मत्स्य आणि हाउसिंग मतदारसंघातून जयेश विश्वंभर माने विजयी झाले.
दुसरीकडे निलंगा विकास संस्थेतून भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू तथा परिवर्तन पॅनलचे प्रमुख अरविंद पाटील निलंगेकर हे देखील विजयी झाले आहेत.
Leave a Reply