दूर युरोपातील सायबेरिया अन् आईसलँडच्या गोठलेल्या प्रदेशातून हजारो मैलांचा खडतर प्रवास करत, नांदूर मध्यमेश्वरच्या पाणथळ क्षेत्रावर हजेरी लावणारा ‘टफ्टेड डक’ म्हणजेच एक विलोभनीय बदकांचा राजपुत्रच! तसा काळा रंग आपण सौंदर्याचं प्रतीक क्वचितच मानतो पण याचा चकाकणार गडद काळ्या पंखांची शान त्यावर लख्ख सोनेरी डोळ्याची ठेवण आणि डोक्यावर हवेत मुकुटासारखा डोलणारा मोहक तुरा या पाखराचे सौंदर्य अधिकच वाढवतो.
इतर साध्या बदकांसारखा हा फक्त पाण्यावर तरंगत नाही, तर पाण्याच्या तळाशी डुबक्या मारून शंख-शिंपले शोधण्यात पटाईत असतो. अंधुक प्रकाशातही लख्ख चमकणारे त्याचे सोनेरी-पिवळे डोळे आणि धोका जाणवताच पाण्याखाली अचानक अदृश्य होऊन दूर मान वर करण्याचा त्याचा खेळ थक्क करणारा आहे. याला प्रत्यक्ष बघितल्यावर निसर्गाचा हा जादूगार मनाला भुरळ घालतो हे नक्की! तर मग येताय ना या राजपुत्राला भेटायला नांदूर मध्यमेश्वरला? सोनेरी डोळ्यांचा तुऱ्यावाला पाहुणा तुमची वाट बघतोय.
— हिरालाल चौधरी (वन परिक्षेत्र अधिकारी, नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य)
फोटो गॅलरी



Leave a Reply