पंढरपूर तालुक्यातील आंबे येथे झालेल्या विहीर दुर्घटनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. एनडीआरएफ टीमने राबवलेल्या बचाव आणि शोध कार्यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चारपैकी आणखी एका मजुराचा मृतदेह सापडला आहे. रात्री उशिरा एक मृतदेह बाहेर काढण्यात यश आले होते, तर आता दुसरा मृतदेहही सापडला आहे. आज पहाटेच्या सुमारास मंगेश मोरे यांचा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आला असून, यापूर्वी सिद्धेश्वर घाडगे यांचा मृतदेह सापडला होता.
दोघांचा शोध सुरूच
आबा घोडके आणि तानाजी घोडके हे दोन मजूर अद्याप ढिगाऱ्याखाली अडकले असून त्यांचा शोध सुरू आहे. काल, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू असलेली शोध मोहीम आज दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. एनडीआरएफ टीमने बाहेर काढलेले दोन्ही मृतदेह पोस्टमार्टम करून कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलेले दोन मजूर रांजणी गावातील असून, अनवली गावच्या दोन मजुरांचा शोध सुरू आहे.
विहिरीत नेमके काय घडले?
पूर्ण झालेल्या विहिरीचे मोजमापाचे काम सुरू असताना अचानक ढिगारा कोसळल्याने मजूर गाडले गेल्याची दुर्घटना आंबे गावात घडली. येथील शेतकरी निवास शिंदे यांच्या विहिरीचे काम पूर्ण झाले होते. जवळपास ५० फूट खोलीच्या या विहिरीचे मोजमाप घेण्याचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. मोजमापासाठी विहिरीत उतरलेले चारही मजूर गाडले गेले. यापैकी दोन मजूर अनवली आणि दोन मजूर आंबे गावातील आहेत. घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आले. काल दिवसभर मजुरांचा शोध सुरू होता. मात्र रात्री उशिरा एनडीआरएफ टीम दाखल झाल्यानंतर आतापर्यंत दोन मजुरांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे.
Leave a Reply